Maharashtra ST Bus Accident in Ratnagiri Guhagar : रत्नागिरीतील गुहागर तालुक्यामध्ये दोन एसटी बस समोरासमोर धडकल्यामुळं मोठा अपघात झाला आहे. या अपघातात २५-३० प्रवासांना दुखापत झाली आहे. या अपघातात शाळकरी विद्यार्थीही दुखापत झाली आहे. या अपघातात दोन्ही बस चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना इतर जखमी प्रवासांसह RGPPL रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं अपघाताच्या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे.
कुठं घडली घटना?
धोपावे-चिपळूण एसटी बस आणि गुहागर डेपोची एसटी बस विरुद्ध दिशेनं येत होत्या. पहिली एसटी धोपावे वेलदुर मार्गे चिपळूणला तर दुसरी गुहागर शृंगारतळी मार्गे अंजनवेलकडं जात होती. एका अवघड वळणावर अंदाज न आल्यानं दोन्ही चालकांचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि दोन्ही बस एकमेकांवर आदळल्या. पवार साखरी मार्गावरील नागदेवाडी फाट्या नजीकही ही टक्कर झाली. ही धडक एवढी जोरात होती, की एसटी बसच्या समोरील भागांचा चक्काचूर झाला. गुहागरमध्ये आज सकाळी (१२ सप्टेंबर) हा अपघात झाला. त्यात पावसाचा जोर असल्यामुळं अपघाताचं गांभीर्य अजून वाढलं असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा – VIDEO : मृत्यूला जवळून पाहिलं..! रुळ ओलांडताना रिक्षाचालकासमोर आली ट्रेन, मग…
याआधी गुहागरमध्ये बस अपघात झाला होता. गणेश चतुर्थीच्या आधी मुंबईकडं जाणाऱ्या एका खासगी बसन उमरठकड जाणाऱ्या एसटीला धडक दिली होती. त्यानंतर खासगी बसचालकानं गाडीसह तेथून पोबारा केला होता. या धडकेमध्ये एसटीमधील १६ गणेशभक्तांसह ३ लहान मुले जखमी झाली होती.
कोकणात पाऊस
अनंत चतुर्दशीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. तर सिंधुदुर्गातही पावसाची संतातधार सुरु आहे. वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळं जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.