Teachers Day : आज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. कोणत्याही मुलाचं भविष्य घडविण्याचं काम शिक्षक करत असतात. या शिक्षक दिनानिमित्त आपण अशा शाळेबद्दल जाणून घेऊया जिथं कधीही सुट्टी नसते. या शाळेनं आठवड्यातील सातही दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी आपले दरवाजे खुले ठेवले आहेत. महाराष्ट्रातील पुणे शहराच्या पूर्वेस ६० किमी अंतरावर कर्देलवाडी हे छोटेसं गाव आहे. या गावात एक अनोखी शाळा आहे. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा आठवड्याचे सातही दिवस सुरू असते. दोन दशकांपासून इथं एकही देण्यात आलेली नाही.
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) च्या लोकांनी या वर्षात दोनदा गावाला भेट दिली आहे. या दरम्यान त्यांनी बराच काळ गावात घालवला. खरं तर ही शाळा वर्षातील ३६५ दिवस कशी काम करते, हे समजून घेण्याचा त्यांचा हेतू होता. दत्तात्रेय आणि बेबीनंद सकात दाम्पत्य ही शाळा चालवतात. दोघेही जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. या दोन्ही लोकांची २००१ मध्ये इथं नियुक्ती झाली होती. गेल्या २० वर्षात शाळेनं एकदाही विद्यार्थ्यांसाठी एक दिवसही आपले दरवाजे बंद केलेले नाहीत.
हेही वाचा – ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात सुधा मूर्ती कोकणातल्या कोणत्या शाळेसाठी खेळल्या? ती शाळा करते काय?
शिक्षकांना पुरस्कार
लक्षात घेण्यासारखे आहे, की या शाळेत नियुक्ती झाल्यापासून सकात यांनी कधीही रजा घेतली नाही. कधी ते विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी झाले नाही, कुणाच्या अंत्यविधीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. शाळा कधीच बंद होऊ न देण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यामुळंच या दोघांच्या प्रयत्नांची आणि मेहनतीची दखल घेऊन त्यांना अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. या शिक्षक दाम्पत्याला जिल्हा परिषद, राज्य व केंद्र शासनाचे खूप पुरस्कार मिळाले. राष्ट्रपतींच्या हस्ते बेबीनंद यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारही देण्यात आला आहे.
सुट्टी नसलेली शाळा कशी सुरू झाली?
दत्तात्रेय म्हणाले, ”दुसऱ्या शाळेत ११ वर्षे काम केल्यानंतर माझी इथं बदली झाली. मी इथं आलो तेव्हा ही शाळा चार खोल्यांची एक मजली इमारत होती. खरं सांगायचं तर हे सगळं अगदी निर्जीव होतं. आम्ही बागकाम, भिंतींवर चित्रे काढणं, मातीपासून खेळणी बनवणं, शाळेचे स्वरूप आणि वातावरण जिवंत करणं अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली.”
हेही वाचा – डॉक्टरांशी बोलता बोलता पेशंटला आला हार्ट अटॅक; मग पुढं..! कोल्हापूरातील VIDEO व्हायरल
“आम्हाला लक्षात आलं आहे की मुलांना उपक्रमांमध्ये रस आहे, म्हणून आम्ही त्यांना केवळ अभ्यासापुरतं मर्यादित न ठेवण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांना वर्गांमध्ये मुक्तपणं फिरू दिलं. काही विद्यार्थी वीकेंडलाही काही उपक्रम करायला यायचे, त्यामुळे आम्हीही रोज शाळेत येऊ लागलो आणि अशीच शाळेची सुरुवात झाली.