Sudha Murthy On Konkan : ज्येष्ठ समाजसेविका, लेखिका आणि पद्मश्री डॉ. सुधा मूर्ती यांनी नुकतीच कोकणात भेट दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या बापर्डे गावी सुधा मूर्ती आल्या होत्या. येथील यशवंतराव राणे कॉलेजचं त्यांनी उद्धाटन केलं. ‘कोण होईल मराठी करोडपती’ या कार्यक्रमात मूर्ती खेळल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी जिंकलेले २५ लाख रुपये बापर्डेच्या शाळेला देऊ केले. या शाळेचं वैशिष्ठ्य म्हणजे ही शाळा लोकअनुदानातून चालवली जाते. आता याच शाळेनं पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी कॉलेज सुरू केलं. या कॉलेजच्या उद्घाटनप्रसंगी मूर्तींनी सर्वांना मार्गदर्शन केलं. त्यांनी कोकणाबाबतही आपले विचार मांडले. शिवाय एक खंतही व्यक्त करून दाखवली.
”कोकण स्वर्गच पण…”
सुधा मूर्ती म्हणाल्या, ”कोकणाबद्दल नेहमी कुतूहूल होतं. कोकण हे गुजरात ते केरळपर्यंत आहे. महाराष्ट्रातील कोकण मी कधीही पाहिलं नव्हतं. मी कारवार, केरळ बघितलं. परंतू महाराष्ट्रातील कोकणाचा माझा तसा संबंध आला नव्हता. त्याच्याबद्दल मला आदर होता. स्वातंत्र्यलढ्यातील माणसं ही कोकणातील होते. लोकमान्य टिळक म्हणा, गोखले म्हणा, किंवा फडके म्हणा. ही एवढी हुशार माणसं एवढ्या छोट्या जागेतून कसे काय आले, इथलं पाणी वेगळं आहे का? म्हणून इथलं पाणी प्यायचं ठरवलं. आम्ही देशारचे लोक, आम्हाला शिस्त कमी आहे, कोकणातील लोकांना भयंकर शिस्त आहे. हेच मला बघायचं होतं. इथल्या लोकांना निसर्गाची भेट आहे. कोकण हा स्वर्गच आहे, मात्र स्वर्गात जाणारे रस्ते खराब आहे. मी काही राजकारणी नाही, पण मला जे दिसतं ते मी बोलते. आमच्या कर्नाटकचे , केरळचे रस्ते चांगले आहेत, गुजरात, गोव्याचे रस्ते चांगले आहेत. पण कोकणाचे रस्ते तेवढे चांगले नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांनी ही गोष्ट पाहावी. फक्त कोकणाचं वरून दृश्य चांगलं असून चालणार नाही.”
हेही वाचा – ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात सुधा मूर्ती कोकणातल्या कोणत्या शाळेसाठी खेळल्या? ती शाळा करते काय?
हेही वाचा – IND Vs ENG Semifinal : “हरण्याच्या पद्धतीवरून…”, भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर आनंद महिंद्राही नाराज!
सुधा मूर्तींचं कोकणातील रस्त्यांविषयीचं मत अनेक ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहे. बापर्डे गावाशिवाय अशी अनेक गावं आहेत, जिथं अजूनही रस्त्यांची व्यवस्था नाही. दरवर्षी फक्त डांबरीकरण आणि खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं, पण एकदाच तो प्रश्न का सोडवला जात नाही, असा सवालही आता लोकांना पडत आहे. आम्हाला फक्त पायाभूत सुविधा ज्यात रस्ते फार महत्त्वाचे आहेत, ते नीट मिळावेत, अशी अपेक्षा सातत्यानं ठेवली जात आहे. तळकोकणात तेही एका छोट्या गावात सुधा मूर्तींचं आगमन होईल, असा विचारही बापर्डेकरांनी केला नव्हता. तीन-चार डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव, जिथं काही वर्षांपूर्वी व्यवस्थित संपर्काची साधनं नव्हती, अशा ठिकाणी जागतिक प्रतिष्ठा लाभलेली व्यक्ती येणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट. पण गावाचं नाव मोठं होतंय ही समाधानाची बाबच प्रत्येक ग्रामस्थाच्या ओठावर आहे.