‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात सुधा मूर्ती कोकणातल्या कोणत्या शाळेसाठी खेळल्या? ती शाळा करते काय?

WhatsApp Group

मुंबई : इन्फोसिस फाउंडेशन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन उभ्या राहतात सुधा मूर्ती. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो काही सोन्या चांदीचा भात खात नाही, त्याचं पोट साध्या तांदळानंच भरतं, तर मग आपल्याकडची अतिरिक्त संपत्ती समाजातील गरजूंच्या साठी का खर्चू नये, याची जाण असणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुधा मुर्ती. आपण जे कमावलं ते दुसऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीनं कसं देता येईल आणि जोपर्यंत आपण या भूतलावर आहोत, तोपर्यंत आजूबाजूच्या समाजासाठी आपल्याला कसं झिजता येईल, याचं ताजं उदारहण म्हणजे सुधा मूर्ती. लेखिका, शिक्षिका, समाजसेविका अशा नानाविध भूमिका जगणाऱ्या सुधा मूर्तींविषयी जेवढं लिहिलं, बोललं जाईल तेवढं कमीच. अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात सुधा मूर्ती आल्या, तेव्हा त्यांनी अमिताभ यांना वाकून नमस्कार केला होता. थोडा वेळ अवघडलेल्या अमिताभ यांनीही सुधा मूर्तींना वाकून नमस्कार करत आशिर्वाद घेतला. आजही हा क्षण अनेकांच्या मनात ताजा आहे. सचिन खेडेकर यांच्या ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमामध्ये सुधा मूर्ती यांचा परत एकदा प्रवेश झाला आणि नम्रपणा काय असतो, याची प्रचिती पुन्हा सर्वांना आली.

या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पद्मश्री सुधा मूर्ती यांनी भाग घेतला. समाजासाठी केलेलं कार्य, शिक्षणाचं महत्त्व सुधा मूर्तींनी कार्यक्रमाद्वारे सर्वांसमोर आणलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातून भेट म्हणून मिळालेली, राजमातांनी दिलेली साडी परिधान करीत, सुधा मूर्तींनी आपल्या सुंदर आणि सोप्या विचारांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमात सुधा मूर्ती तळकोकणातील एका शाळेसाठी खेळल्या. ही शाळा नेमकं काय करते? ती नक्की आहे तरी कुठं? असे प्रश्न अनेकांच्या मनात आले असावेत.

हेही वाचा – बातमीच आहे ‘भारी’..! भारतीय शास्त्रज्ञांनी खाऱ्या पाण्यावर चालणारा LED कंदील तयार केलाय!

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर जिंकलेली संपूर्ण रक्कम रु. २५ लाख, सुधा मूर्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावच्या श्रीदेवी पावणा देवी कृपा शिक्षण विकास मंडळ या संस्थेच्या यशवंतराव राणे शाळेला देणगी देणार आहेत. या संस्थेची व शाळेची स्थापना २०११ साली झाली. गावातील मुलांना माध्यमिक शिक्षणासाठी रोज दहा किलोमीटर प्रवासाची पायपीट करावी लागत होती. एसटीची सोय होती, पण गावच्या कित्येक गरीब कुटुंबाला रोज दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. त्यात हा खर्च कुठून करावा? असा प्रश्न होता. म्हणून गावातच माध्यमिक शाळा असावी, असा संकल्प पुढं आला.

फक्त बोलून नाही, करून दाखवलं!

बापर्डे गावातील घाडी बंधूंनी आपली दोन एकर जागा शाळेसाठी संस्थेला विना मोबदला दिली. त्यानंतर गावातील लोकांनी एकत्र येऊन माजी आमदार अमृतराव राणे यांच्या नेतृत्वाखाली शाळेसाठी एक समिती नेमली आणि मग सुरू झाला शाळेच्या निर्मितीसाठीचा संघर्ष. गावातील एक दानशूर व्यक्ती धोंडबाराव राणे यांनी संस्थेसाठी पंधरा लाख रुपये देण्याचं मान्य केलं. परंतु शाळेच्या निव्वळ इमारत बांधणीसाठीच ४०-५० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यासाठी बापर्डे गावच्या मुंबईकर मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. काही दानशूर मंडळींनी प्रत्येक वर्ग खोलीचे एक लाख याप्रमाणं पैसे दिले. काहींनी दहा हजार, पाच हजार अशी रक्कम जमा करून संस्थेला मदत केली. संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. (डॉ.) सुहास राणे यांच्या साहाय्याने सुधा मूर्ती यांच्या इन्फोसिस फाउंडेशनपर्यंत पोहोचता आले आणि इमारतीसाठी कमी पडत असलेली १० लाख रुपये इतकी रक्कम देऊन सुधा मूर्तीं भक्कमपणे संस्थेच्या पाठीशी २०१२साली उभ्या राहिल्या.

सगळं ठीक सुरू होतं, इतक्यात…

एकीकडे इमारतीचं बांधकाम सुरू असताना तात्पुरत्या स्वरूपात छोट्या खोल्या उभारून शाळा सुरू करण्यात आली. इमारतीचं बांधकाम स्वतः नियामक समिती मधील मंडळींच्या देखरेखीखाली अतिशय दर्जेदार आणि उच्च दर्जाचं आणि ठरलेल्या किमतीपेक्षा कमी खर्चात झालं. एकीकडं इमारतीचं बांधकाम सुरू होतं, तर दुसरीकडं शाळेच्या मान्यतेसाठी सरकार दरबारी अर्ज, विनंत्या सुरू होत्या. महाराष्ट्र सरकारनं पुढील दहा वर्षांसाठी शैक्षणिक धोरण तयार केलं होतं, त्याप्रमाणं नवीन शाळांचे अर्ज शासनाने मागवले होते. अगदी नियमाबरहुकूम २०१२ साली शाळेच्या मान्यतेसाठी आणि शासकीय अनुदान मिळण्यासाठी शासन दरबारी अर्ज सादर करण्यात आले. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या दहा वर्षाच्या बृहत आराखड्यातही संस्थेचे नाव जाहीर झालं.

एकीकडं भरपूर कष्टातून आणि एक एक रुपया जमवून शाळेची इमारत उभी केली, पण शाळेच्या मान्यतेसाठी शासन दरबारी पुढं काहीच होत नव्हतं. मान्यता नाही, शासकीय अनुदान नाही आणि शाळा चालवण्याचा खर्च पेलवत नव्हता. आठवी, नववी आणि दहावी असे तीन वर्गांचा वार्षिक खर्च आठ ते दहा लाख रुपये येत होता. हा पैसा आणायचा कुठून? असा प्रश्न संस्थाचालक आणि ग्रामस्थांसमोर होता. कित्येक वेळेला शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसेच नसायचे, हात उसनवारी करावी लागत होती. गावातील मुंबईकर मंडळींनी शाळेच्या मदतीसाठी कित्येक वेळेला मुंबईमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले.

हेही वाचा – कैदी नंबर ८९५९..! संजय राऊतांचं जेलमध्ये कसं चाललंय? कोण येतं भेटायला? इथं वाचा!

परंतु नंतरची धक्कादायक बाब म्हणजे २०१६-१७ साली शासनानं बृहत आराखडाच रद्द करून टाकला. त्यामुळं अनुदान मिळण्याची शाळेची उरली सुरली आशाही संपुष्टात आली. परंतु शंभरेक विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता, शाळा बंद करणे आता शक्य नव्हते. मग नाईलाजानं २०२१ मध्ये स्वयं अर्थसहाय्य तत्वावर शासनाकडं परत अर्ज करण्यात आला. आणि आता २०२२ मध्ये स्वयं अर्थसहाय्य तत्वावर शाळा सुरू ठेवण्याची शासनाची मान्यता शाळेला मिळाली आहे. परंतु यासाठी दरवर्षी १०-१५ लाखाचा खर्च कसा उभा करायचा हा प्रश्न संस्थाचालका समोर आहेच.

शाळेसाठी जन्मले नवे शाहु-फुले-आंबेडकर!

एखाद्या खेडेगावात, दुर्गम भागात, गोरगरिबांच्या शिक्षणासाठी स्वयं अर्थसहाय्य तत्वावर शाळा चालवणं हे किती कठीण काम आहे, हे प्रत्येकजण जाणतो. कित्येक वेळेला ही शाळा बंद पडते की काय अशी चिंता सतत संस्थाचालकांच्या मनात असते. शाहु, फुले, आंबेडकर याचं कार्य किती महत्त्वाचं होतं, याची जाण पुढच्या पिढीला असेल का ते सांगण कठीण आहे. पण नव्या रुपात जन्मलेले अनेकजण आजही शिक्षणप्रसाराचं काम तेवढ्याच ताकदीनं करत आहेत. प्रा. (डॉ.) सुहास राणे आणि त्यांचे मुंबईकर व बापार्डवासिय सोबती यांच्यामुळं ही शाळा आज उभी आहे. सुहास राणे आणि सुधा मूर्ती यांचे खूप जुने ५० वर्षांचे ऋणानुबंध आहेत. त्यांच्यामुळेच आज जागतिक किर्तीच्या या समाजसेविका बापर्डे गावातील या छोट्या शाळेच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत. सुधा मूर्तींच्या या नव्या देणगीमुळे संस्था आता पुन्हा नव्या जोमाने ६ वी ते १२वी पर्यंत वर्ग वाढवून प्रगतीपथावर वाटचाल सक्षम झाली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment