बल्लारपूर क्रीडा संकुलानजीक उभे राहणार एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे केंद्र

WhatsApp Group

SNDT University Near Ballarpur Sports Complex : चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे मंजुरी मिळालेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या (एस.एन.डी.टी.) केंद्रासाठी बल्लारपूर क्रीडा संकुलानजिक विद्युत विभागाच्या जागेची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या केंद्रासाठी नवीन इमारत बांधकाम सुरू करण्यासाठी ५० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यात नकाशा मंजुरी व इतर प्राथमिक कामे तातडीने करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे विद्यापीठासाठी ५० एकर जागेची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी, अधिक्षक अभियंता (महावितरण) संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता अवघड (महापारेषण), न.प. मुख्याधिकारी विशाल वाघ, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, आर्किटेक्ट आनंद भगत, भुमी अभिलेख विभागाचे अधिक्षक प्रमोद घाडगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – महाराष्ट्रातील ‘या’ तीन विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाचा वाटा मोठा आहे, असे सांगून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वेगवेगळे शैक्षणिक, रोजगारभिमुख आणि कौशल्य आधारीत अभ्यासक्रमांना आजही मागणी आहे. याच उद्देशाने चंद्रपूर आणि परिसरातील विद्यार्थीनीना आवश्यक असणारे साधारण १० अभ्यासक्रम या विद्यापीठातून शिकविण्यात येतील.

सार्वजनिक बांधकाम विभागाने विद्यापीठाचे बांधकाम नाविण्यपूर्ण पद्धतीने करावे. विद्यार्थींनीसाठी संपूर्ण अद्ययावत सोयीसुविधा तेथे उपलब्ध कराव्यात. विद्यापीठ केंद्राच्या इमारतीचे बांधकाम एका वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करा, अशा सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.

हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत एस.एन.डी.टी विद्यापीठाचे पुढील शैक्षणिक सत्राचे अभ्यासक्रम बल्लारपूर नगर परिषदेने नव्याने बांधलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस मुलींची डीजीटल शाळा येथे सुरू करण्यात येणार आहेत. या शाळेची देखील पालकमंत्र्यांनी पाहणी केली. येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विद्यार्थीनींसाठी जवळच वस्तीगृहाची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी नायब तहसीलदार साळवे, सा.बा. विभागाचे मुत्यलवार यांच्यासह चंदनसिंग चंदेल, आशिष देवतळे, हरीष शर्मा, काशीसिंग, मनिष पांडे, नीलेश खरबडे आदी उपस्थित होते.

Leave a comment