मूसेवाला हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पुण्याच्या संतोष जाधवनं ‘स्टेटस’ ठेऊन एकाला संपवलं होतं!

WhatsApp Group

मुंबई : काँग्रेस नेता आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलंय. २९ मे रोजी मूसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय. खुनाचा भाग म्हणून संजय जाधवला पुणे, पंजाब आणि दिल्ली पोलिसांच्या पथकानं गुजरातमधून अटक केली. जाधवसोबत त्याचा साथीदार नवनाथ सूर्यवंशीही या हत्येत सहभागी असल्याचं कळतंय. याआधी जाधव नेपाळला फरार झाला असल्याचं सांगण्यात येत होतं.

पोलिसांनी १२ जून म्हणजेच रविवारी रात्रीच संतोष जाधवला कर्तव्यदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केलं. न्यायालयानं त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मूसेवाला हत्येप्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींची ओळख पटली असून याप्रकरणी सौरभ महाकाल याला आधीच अटक करण्यात आलीय. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी विविध राज्यांचं पोलीस पंजाब पोलिसांशी सतत संपर्कात आहेत. संतोष जाधवची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून या हत्येशी संबंधित महत्त्वाचे सुगावा मिळू शकतात, असा विश्वास पोलिसांचा आहे.

कोण आहे संतोष जाधव?

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य म्हणून ओळख असलेल्या संतोष जाधवला २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलं. गेल्या एक वर्षापासून तो फरार होता. या हत्याकांडानंतर जाधवला आश्रय दिल्याच्या आरोपावरून पुणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या आठवड्यात सिद्धेश कांबळे उर्फ ​​महाकाल याला अटक केली. पटकथा लेखक सलीम खान आणि त्यांचा मुलगा बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांना धमकीची पत्रं पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी महाकालची चौकशीही केली. जाधवला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी आपलं पथकं गुजरात आणि राजस्थानला पाठवली होती.

राण्याला मारण्यापूर्वी ठेवला होता स्टेटस

एका प्रकरणात, संतोष जाधववर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) देखील दाखल करण्यात आला होता. संतोष जाधव हा डॉन अरुण गवळीच्या टोळीचा जवळचा असून त्याच्यावर त्याचा प्रतिस्पर्धी ओंकार बाणखेले उर्फ ​​राण्याची हत्या केल्याचाही आरोप आहे. या हत्येनंतर जाधव फरार होता. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, जाधवनं राण्याला मारण्यापूर्वी सोशल मीडियावर ‘सूर्य उगवताच मी तुला संपवून टाकेन’ असा स्टेटस ठेवला होता. याला उत्तर देताना राण्यानं लिहिले होतं, ”जेव्हा मी संतोष जाधवला भेटेन, तेव्हा मी त्याला ठोकेन”. त्यानंतरच १ ऑगस्ट २०२१ रोजी दुचाकीवरून आलेल्या शूटरनं राण्याची गोळ्या झाडून हत्या केली.

Leave a comment