कैदी नंबर ८९५९..! संजय राऊतांचं जेलमध्ये कसं चाललंय? कोण येतं भेटायला? इथं वाचा!

WhatsApp Group

Sanjay Raut Jail Routine : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. जेलमध्ये  त्यांना दहा बाय दहाची स्वतंत्र बॅरेक मिळाली असून त्यात स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्नानगृहही आहे. त्यांना एक बेड आणि पंखाही मिळाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं आहे. एवढेच नाही तर त्यांच्या बॅरेकभोवतीही सुरक्षा व्यवस्था मजबूत असते. जेलमध्ये त्यांची ओळख कैदी क्रमांक ८९५९ अशी आहे. राऊत तुरुंगात असतानाही महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्व माहिती त्यांना मिळते.

कोणाला भेटू शकतात राऊत?

राऊतांनी कारागृह प्रशासनाकडं वही आणि पेनची मागणी केली होती, ती मंजूर झाली आणि आता ते दिवसभरात अनेकदा काहीतरी लिहितात. एवढंच नाही तर त्यांनी अनेक पुस्तकांची मागणी केली होती, जी त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आता दिवसभर ते लिहितात किंवा पुस्तकं वाचतात. संजय राऊत यांना कुटुंबियांशिवाय कोणालाही भेटण्याची परवानगी नाही. तुरुंगाच्या नियमांनुसार केवळ कुटुंबातील सदस्यच त्यांना भेटू शकतात. नुकतेच काही खासदार आणि आमदार राऊत यांना भेटायला गेले होते, मात्र कारागृह प्रशासनानं त्यांना भेटू दिलं नाही. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना घरून अन्न व औषधं दिली जात आहेत.

हेही वाचा – काय आहे पत्रा चाळ घोटाळा? संजय राऊत कसे अडकले? जाणून घ्या!

संजय राऊतांच्या बॅरेकबद्दल माहिती देताना एका सूत्रानं सांगितलं, की ते तुरुंगात पोहोचताच त्यांना बेडिंगचं साहित्य देण्यात आले, ज्यामध्ये एक ब्लँकेट आणि झोपण्यासाठी चादर समाविष्ट आहे. सध्या त्यांना झोपायला बेड दिला जाणार नाही. कारागृह प्रशासन याबाबत नंतर निर्णय घेईल.

राऊत यांचा आहार

राऊतांना तुरुंगात दिवसातून दोनदा ७५० ग्रॅम अन्न मिळेल, त्यात चपाती, डाळ, भाजी, भात असेल. मात्र, सकाळच्या नाश्त्यात त्याला इतर कैद्यांप्रमाणं त्यांना पोहे, शिरा, अंडी किंवा उपमा खायला मिळेल. याशिवाय कोविड काळात कैद्यांना दिलं जाणारं हळदीचं दूधही राऊत यांच्या आहाराचा भाग असेल.

हेही वाचा – धक्कादायक..! महिलेला ७० सेकंदात २८ शिव्या; सोशल मीडियावर संजय राऊतांची ऑडिओ टेप?

सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर आठ दिवसांनी सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयानं त्यांना २२ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. १०३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी राऊतांना अतिरिक्त कोठडीची आवश्यकता नसल्याचं ईडीनं कळवलं होतं.

१ ऑगस्टला राऊतांना अटक

ईडीनं ३१ जुलै रोजी संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानावर छापा टाकला होता, त्यानंतर एजन्सीनं त्यांना ताब्यात घेतलं होतं. दुसर्‍याच दिवशी, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनच्या गोरेगावमधील पत्रा चाळच्या पुनर्विकास प्रकल्पातून उद्भवलेल्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात एक ऑगस्टच्या पहाटे राऊतांना अटक करण्यात आली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment