मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसारखी लाइफस्टाइल कोणाला जगायला आवडणार नाही? शाहरुख खान ‘मन्नत’ ज्या आलिशान बंगल्यात राहतो, त्या बंगल्यात जाणं तर दूरची गोष्ट, पण तो पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किंग खानचा जवळचा मित्र सलमान खानदेखील मन्नतमध्ये राहण्याचं स्वप्न पाहत होता. हो हे अगदी खरं आहे. सलमाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहरुखशी संबंधित अशाच एका गोष्टीचा खुलासा केला. सलमाननं सांगितलं, ”मला हा बंगला शाहरुख खानच्या आधी ऑफर करण्यात आला होता. मात्र मी तो खरेदी करण्यास नकार दिला.”
सलमाननं मन्नत का खरेदी केला नाही?
सलमान खान म्हणाला, ”शाहरुख खानचा मन्नत बंगला घेण्याची ऑफर मला आधी त्याच्या आधी आली होती. त्यानंतर मी माझ्या करिअरला सुरुवात केली होती. माझे वडील सलीम खान म्हणाले एवढ्या मोठ्या घरात काय करणार? मला शाहरुख खानला विचारायचे आहे, की तो एवढ्या मोठ्या घरात काय करतो?” वडिलांनी आक्षेप घेतल्यानंतर सलमान खाननं हा बंगला खरेदी केला नाही, मात्र शाहरुख खाननं तो खरेदी केला.
सलमान खान त्याच्या आई-वडिलांसोबत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. सलमानचं घर किंग खानच्या घरासारखं आलिशान नाही, परंतु मुंबईच्या हॉटस्पॉटमध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटचा समावेश आहे. दुरून सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासन्तास त्याच्या घराबाहेर उभे असतात.
हेही वाचा – स्वत:ला टोल टॅक्सचा ‘बाप’ म्हणत नितीन गडकरींनी दिली ‘ही’ खुशखबर!
मन्नत हा मूळ बंगला कुणाचा?
एका मुलाखतीत गौरी खाननं सांगितलं होतं, की या बंगल्याचं इंटीरियर डिझाइन करायला चार वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. ती प्रवास करायची, तिच्या आवडीची प्रत्येक वस्तू विकत घ्यायची आणि घराचा प्रत्येक कोपरा पूर्ण उत्साहानं सजवायची, जेणेकरून सर्वकाही परिपूर्ण वाटेल. यानंतरच गौरीनं इंटेरिअर डिझायनर म्हणून काम करायला सुरुवात केली. हा बंगला एकेकाळी ‘विला व्हिएन्ना’ म्हणून ओळखला जात होता आणि मुंबईच्या कलाविश्वातील एक मोठं नाव असलेल्या गुजरातमधील पारशी किकू गांधी यांच्या मालकीचा होता. किकू गांधी हे मुंबईतील प्रतिष्ठित ‘शिमोल्ड आर्ट गॅलरी’चे संस्थापक आहेत. मन्नतच्या पुढे आणखी एक बंगला आहे, त्याला ‘किकी मंझिल’ म्हणतात. किकू गांधींचे आई-वडील येथे राहत होते. हे दोन्ही बंगले किकू गांधी यांच्या वडिलांचे होते. इतकंच नाही तर शाहरुख खान ज्या बंगल्यात आता राहतो त्याच बंगल्यात किकू गांधीचा जन्मही झाला होता. हे दोन बंगले शेजारी शेजारी आहेत आणि त्यांच्यात फक्त एकाच भिंतीचा फरक आहे.
मन्नतची किंमत किती असेल?
मन्नतबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतील आलिशान बंगल्यांमध्ये त्याची गणना होते. याचं शाहरुख आपल्या कुटुंबासोबत मन्नत, वांद्रे, मुंबई येथे अनेक वर्षांपासून राहत आहे. हा सहा मजली बंगला आहे. मन्नतमध्ये सर्व लक्झरी सुविधा आहेत. रिपोर्ट्सनुसार, मन्नतची किंमत २०० कोटी रुपये आहे. मन्नतच्या बाहेरील नामफलकाची किंमत २५ लाख असल्याचं सांगितलं जातं. हे इतकं महाग असण्याचं कारण म्हणजे ते हिरेजडित आहे. मन्नतच्या इंटिरिअरमधील प्रत्येक वस्तू अतिशय खास आणि दर्जेदार आहे. घराच्या टेरेसवरून समुद्राचं दृश्य दिसतं.