Santacruz East Encroachment : सांताक्रुझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीनजीक असलेल्या खुल्या मैदानातील अतिक्रमण काढावे, बांधकाम कचरा खुल्या मैदानावर टाकणाऱ्या संबधितावर कारवाई करुन मैदान स्वच्छ करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. सांताक्रुझ पूर्व येथील एच ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग अळवनी तसेच सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री लोढा म्हणाले, ”सांताक्रुझ पूर्व चोपडा इमारती नजीकच्या प्रभात कॉलनी येथील खुल्या मैदानात बांधकाम कचरा टाकून या जागेवर अतिक्रमण केले असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. ज्यांनी कचरा खुल्या मैदानावर टाकला आहे त्या संबधितावर कारवाई करुन हे मैदान स्वच्छ करावे. ज्या सोसायटींनी नवीन पाणी कनेक्शनसाठी मागणी केली आहे, ती तातडीने पूर्ण करावी. रस्ता बांधकाम करताना विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे आधी पुनर्वसन करा मगच शासकीय कामाची कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे. ज्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत तक्रारी आहेत तिथे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे.”
हेही वाचा – Video : “मी रोज २-३ किलो शिव्या खातो…”, तेलंगणात असं का म्हणाले PM मोदी? वाचा!
नागरिकांनी विविध समस्यांविषयीच्या सुमारे ३२२ तक्रार अर्ज यावेळी सादर केले. त्यांपैकी १५१ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याच्याही सूचना लोढा यांनी यावेळी दिल्या.
‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात तक्रारीसाठी portal.mcgm.gov.in या लिंकवरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.