BMC Budget : आजच्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे महिलांना शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप मशिन आदी संयंत्र सामग्रीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याने महिला आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि सक्षम होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
चुनाभट्टी येथील सोमैय्या मैदान येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य लाभ वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, सर्वश्री आमदार अॅड. आशिष शेलार, प्रसाद लाड, मंगेश कुडाळकर, सुनिल शिंदे, राजहंस सिंह, सदा सरवणकर, कॅप्टन तमिल सेल्वन, कालिदास कोळंबकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे, श्रीमती भारती लव्हेकर, यामिनी जाधव, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, श्रावण हार्डिकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आज @mybmc च्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत २७ हजार महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्याच्या लाभ वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये १२ हजार ६३२ महिलांना शिवणयंत्र, १२ हजार ४८२ महिलांना घरघंटी आणि १… pic.twitter.com/IqlBQu0xnK
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 13, 2023
शिंदे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देण्याबरोबरच त्यांच्या प्रयत्नांना, प्रगतीला, कष्टाला बळ देण्याचे काम करण्यात येत आहे.जवळपास २७ हजारांहून अधिक पात्र महिलांना शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र दिले जाणार आहेत. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम राज्य सरकार, मनपा करीत आहे. मनपाच्या जेंडर बजेटमध्ये १० ते १५ कोटी रुपये तरतूद होती. यामध्ये साहित्य वाटप, महिलांना सक्षम, पायावर उभे करण्यासाठी २५० कोटी रूपयांची बजेटमध्ये तरतूद केली. मुंबईत अनेक योजनांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. मेट्रोची कामे सुरू आहेत. मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी कायमचा तोडगा काढण्यासाठी ४५० किमीचे सिमेंट काँक्रिंटचे रस्ते केले. उर्वरितही रस्ते काँक्रिटचे करणार असून अडीच वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार आहे.
मुंबई ही आर्थिक राजधानी असून मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करणार बनविण्यासाठी प्रयत्नशील असून मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्या विकासासाठी वापरणार आहे. खराब काम करणारे कंत्राटदार हद्दपार करणार आहे. शहरात १,१७४ सुशोभिकरण प्रकल्प, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून ८ लाख मुंबईकरांना लाभ झाला आहे. सर्व सोयींनीयुक्त दवाखाना असा हा दवाखाना असून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सर्व सुविधा यामध्ये आहेत. मुंबईला प्रदूषणमुक्त करणार आहे. जी-२० कार्यक्रम मुंबईत होत असून देशाला जी-२० चा मान मिळालाय हे अभिमानास्पद आहे. हे सरकार राज्याला विकासासाकडे नेण्याचे काम करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा – IPL 2023 : 6,6,6,6,6..! एका ओव्हरमध्ये अभिषेक शर्माने खाल्ले 5 Six; पाहा Video
लेक लाडकीच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यानंतर सुकन्या योजना, महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सूट, घरघंटी, कांडप मशिन, शिलाई मशिनसोबत मार्केटिंग करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यांच्या वस्तूला बाजारात भाव मिळण्यासाठी मनपाने योजना तयार करावी. मुंबई मनपाच्या ७७ हजार कोटी रूपयांच्या सुरक्षा ठेवी होत्या त्या वाढून ८८ हजार कोटी झाल्या. २५ हजार कोटींची कामे करूनही ११ हजार कोटी रूपयांच्या सुरक्षा ठेवी वाढल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख, लोकोपयोगी काम करीत आहे. केंद्राची राज्याला मदत होत आहे. प्रत्येक निर्णय सर्वसामान्यासाठी घेतोय. सर्व योजना राबवून मुंबईचा कायापालट करण्याच्या ध्येयाबरोबर मुंबई बाहेरचा माणूस पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत २७ हजारांहून अधिक महिलांना शिलाई, घरघंटी आणि मसाला कांडप आदी संयंत्र सामग्रीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याने २७ हजार महिला सक्षम होण्याबरोबरच २७ हजार कुटुंबे सशक्त होणार आहेत. आणखी २५ लाख महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मनपाच्या कामाची दिशा बदलली असून मनपा लोकाभिमुख झाली आहे. मनपातील कामे पारदर्शक पद्धतीनेच होणार असू कामात अनियमितता होत असेल तर कारवाई करण्यात येईल. मनपा, राज्य सरकार महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून बजेटमध्ये महिलांना मदत, एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली. महिलांना सक्षम करण्याचे काम महिला धोरणाद्वारे करणार असून मुंबईतील झोपडपट्टीमध्ये वीज, रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत.
प्रारंभी महिला व बालविकास योजनेच्या पात्र महिलांकरिता शिलाई मशीन, घरघंटी मशीन, मसाला कांडप मशीन यंत्रसामग्री वाटप योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते रिमोटच्या माध्यमातून करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आज प्रातिनिधिक स्वरुपात २५ महिलांना अर्थसहाय्य लाभार्थी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.