

मुंबई : सरसेनापती हंबीरराव चित्रपट पाहिलाय का तुम्ही? थेटरातनं बाहेर पडल्यानंतर हा चित्रपट मराठी आहे की साऊथचा, असा ‘अभिमानास्पद’ प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण होतो. मराठी इंडस्ट्री किती पुढी गेलीय, याचं प्रात्यक्षिक पाहायचं असेल तर हंबीरराव चित्रपट आवर्जुन बघितला गेला पाहिजे. हा चित्रपट काढलाय प्रवीण विठठ्ल तरडेंनी. धर्मवीर, मुळशी पॅटर्न आणि देऊळबंद हे त्यांचे याआधीचे चित्रपट. तरडे किती ‘प्रवीण’ माणूस आहे, याची प्रचिती ‘चला हवा येऊ द्या’ बघणाऱ्या प्रेक्षकाला नक्कीच माहितीये. या कार्यक्रमात निलेश साबळेंनी तरडेंचं केलेलं पात्र आजही आपल्या फोनवर रिल्स, व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं. मराठी सिरीयलमध्ये डायलॉग्ज लिहिणारा हा माणूस मराठीतील सर्वात महागडा चित्रपट काढेल आणि तो तुफान यशस्वी करून दाखवेल, याचा त्यावेळी कुणीही विचार केला नसेल.
तरडेंचा शेतकरी पॅटर्न!
आक्राळविक्राळ वाटणारं व्यक्तिमत्व, झिपरे-कुरळे केस, दांडग्या शरीराचा, लक्षात राहावी अशी मिशी असणारा दिग्दर्शक म्हणजे प्रवीण तरडे. हा माणूस लेखक असेल, असं कुणालाच वाटणार नाही. बरेच लोक या प्रश्नावर पैजही हरतील. पण खरा आणि नवा कंटेंट काय असतो? प्रेक्षकाला कसं आणि कुठे खिळवून ठेवायचं? कुठल्या वेळी कोणता चित्रपट काढायचा? त्यासाठी कोणती स्टारकास्ट पैसावसूल ठरेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं तरडेंना मिळालीत. स्वामींच्या कृपेनं चांगलं चाललंय म्हणणारे तरडे आपण शेतकरी म्हणून या जगातून निघून जाऊ असं सांगतात, तेव्हा ते प्रत्येकाच्या काळजाला हात घालतात.
स्ट्रगल कुणाला नसतो?
हिट चित्रपटांपूर्वी कन्यादान, कुंकू, तुझं माझं जमेना, पिंजरा या मालिकांचं लेखन तरडेंनी केलंय. दिवसातील १८ तास तरडे लेखनात घालवायचे. करियरच्या सुरुवातीच्या काळात ते पुण्यातील गावात नाटक बसवायला जायचे. त्यांनीही कमालीचा संघर्ष केलाय. महिन्याची २० तारीख आली, की घराच्या हफ्त्याच्या टेन्शनमुळं त्यांना झोप लागायची नाही. आयुष्यात प्रत्येकजण स्ट्रगल करतो, पण पैसा नसणारे दिवस विसरता येत नाहीत, असं तरडे म्हणतात. आजही कुणी संघर्ष करत असेल, तर त्यांना मदत करणारे तरडे होते, हे फार कमी लोकांना माहीत असेल.
धर्मपत्नीचं योगदान…
तरडेंची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची बायको स्नेहल. सध्या नवऱ्याच्याच चित्रपटात स्नेहल दिसत असली, तरी ती किती मोठी अभिनेत्री आहे, हे जुन्या आणि हौशी मराठी प्रेक्षकांना ठाऊक असेल. पुरुषोत्तम करंडक स्पर्धा गाजवत स्नेहल-प्रवीण प्रेमात पडले. तरडेंना पहिल्यांदा लॅपटॉपवर काम आणि टाईप करायला स्नेहलनं शिकवलं होतं. लॅपटॉप घेण्याइतपत पैसा नव्हता, तेव्हा मित्रांनी तरडेंना लॅपटॉप घेऊन दिला, जो त्यांना घासून-घासून ७ वर्ष वापरला मुलाला सांभाळता यावं, यासाठी स्नेहलनं ब्रेक घेतला आणि धर्मवीर, हंबीरराव चित्रपटातून दणक्यात कमबॅक केलं. ”दहा-बाय-दहाच्या खोलीतला संसार स्नेहलनं थ्री बीएचकेसारखा मिरवला आणि त्यानंतर चित्रच पालटलं”, असं तरडे आपल्या बायकोविषयी अभिमानानं सांगतात.
आपणही त्या परिस्थितीतून गेलोय याची जाण…
प्रवीण तरडेंबाबत अजून एक गोष्ट कदाचित कुणाला ठाऊक नसेल. माणसाची जसजशी प्रगती होत जाते, तेव्हा त्याच्या महत्त्वाकांक्षा वाढत जातात. मोठं होत असताना, खाली काय असतं ते बहुधा कुणाला दिसत नसतं. आपणच सगळ्यात भारी, असं जेव्हा माणसाला वाटतं तेव्हा तो संपत जात असतो. तरडे टिपिकल याविरुद्ध आहेत. ते आपली जुनी गाडी, बाईक कधीच विकत नाहीत. ते एखाद्या स्ट्रगल करणाऱ्याला देऊन टाकतात. जुन्या गाडीमुळं आपल्याला जे चांगलं नशीब मिळालंय, ते त्या स्ट्रगलरला मिळावं, असं त्याचं मत आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा सरसेनापती बनलेला हा अवलिया भविष्यातील मोठ्या मोहिमा फत्ते करोत, जेणेकरून मराठी प्रेक्षकही त्यांना आदरपूर्वक मुजरा करेल!