पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतच मास्टरमाईंड..! ईडीनं त्यांच्या ‘पगारासह’ दाखल केलं आरोपपत्र

WhatsApp Group

Patra Chawl Land Scam Case : शिवसेना खासदार आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले संजय राऊत यांच्या विरोधात आता ईडीनं आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये संजय राऊतच पत्राचाळ घोटाळ्यात मास्टरमाईंड असल्याचं सांगण्यात आलं. संजय राऊत यांच्यावर झालेल्या सुनावणीत त्यांची कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईडीनं राऊतांविरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या घोटाळ्यातून राऊतांनी पैसे कमावले, असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

पत्रा चाळ जमीन घोटाळा २००७ मध्ये सुरू झाला. हा घोटाळा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण (MHADA), प्रवीण राऊत, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) यांच्या संगनमतानं झाल्याचा आरोप आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून संजय राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असाही उल्लेख ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

हेही वाचा – काय आहे पत्रा चाळ घोटाळा? संजय राऊत कसे अडकले? जाणून घ्या!

ईडीनं आरोपपत्रात म्हटलं, की कलम ३ नुसार परिभाषित केल्यानुसार ३,२७,८५,४७५/- रुपयांच्या गुन्ह्यांमध्ये जाणूनबुजून राऊत यांनी स्वत: लाँडरिंग केलं आहे आणि ते पीएमएलए, २००२ च्या कलम ४ अंतर्गत शिक्षेस पात्र आहेत. प्रविण राऊत यांच्यामार्फत गोरेगाव सिद्धार्थ नगरच्या पुनर्विकासात संजय राऊत थेट सहभागी होते. संकल्पनेच्या टप्प्यापासून ते कार्यान्वयित होईपर्यंत त्यांनी प्रकल्पात सहभाग घेतला.

संजय राऊतांचा पगार

संजय राऊतांना महिन्याला १ लाख ८५ हजार आणि सामना वृत्तपत्रात काम करतात तिथं १ लाख रुपये पगार मिळतो. त्यांच्या पत्नी वर्षा या शिक्षिका असून त्यांना महिन्याला ८० हजार पगार मिळतो. राऊत नोकरीशिवाय कोणताही व्यवसाय करत नाहीत, असं ईडीनं त्यांच्या आरोपपत्रात नमूद केलं आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment