मुंबई : महाराष्ट्रात आपलं सरकार कोसळतंय, हे समोर दिसत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळानं दे-दणादण निर्णय घेतले. यात औरंगाबाद शहराचं ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं ‘धाराशीव’ असं नामांतर करण्यास ठाकरे सरकारनं मंजुरी दिली. याव्यतिरिक्त सरकारनं कॅबिनेट बैठकीत नवी मुंबईच्या विमानतळाला दि.बा. पाटील याचं नाव देण्याचा निर्णय घेतला. या विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील नावानं ओळखलं जाणार आहे. पाटलांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देण्यावर सरकार ठाम होतं, पण शेवटी रायगडमधील स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळं सरकारला आपला हट्ट् सोडावा लागला. विमानतळाच्या नावाची लढाई जिंकलेले दि. बा. पाटील नक्की कोण?
पाटलांचं बॅकग्राऊंड…
कोकणातील प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि रायगडकरांचं लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून दि. बा. पाटलांची ओळख. १३ जानेवारी १९२६ रोजी जासई गावात जन्मलेले पाटील महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते, खासदार, आमदार आणि पनवेल नगराध्यक्ष होते. वडील शिक्षक-शेतकरी अशा दोन्ही भूमिकेत असल्यामुळं पाटलांवर लहानपणापासून चांगले संस्कार झाले. पाटलांनी पुण्यामध्ये वकिलीचं शिक्षण घेतलं. त्यांचे भाऊ आत्माराम बाळू पाटील यांनीही ‘दिबां’च्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला. दि. बा याच्या पत्नी ऊर्मिला पाटील या पनवेलच्या के. व्ही. कन्या शाळेत शिक्षिका होत्या.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील साहेब यांचं नाव देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच मी ही मागणी मा. मुख्यमंत्र्यांना केली होती. आज अखेर माझ्या मागणीला यश आलेच !#dibapatil pic.twitter.com/NUqi3S7zty
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 29, 2022
लोकांचं इतकं प्रेम का?
दि. बा. पाटील यांनी पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचं चार वेळा आमदारपद भूषवलं. याशिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदारही झाले. नवी मुंबईला सिडको उभं करत होतं, तेव्हा दि. बा. प्रकल्पग्रस्तांसाठी उभे राहिले. परिणामी तुरुंगवासही भोगला. दि. बा. यांनी सिडकोविरोधात शेतकऱ्यांच्या हिताचा लढा लढला. या लढ्यात जासई येथील आंदोलनात पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा प्रत्युत्तर देत शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला. रायगड आणि नवी मुंबईतील आगरी जनतेबरोबर दि. बा. पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. याच कारणामुळं नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक शेवटपर्यंत लढले.
आपलं संपू्र्ण आयुष्य लोकांसाठी झिजवणारे दि. बा. शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १६ ऑगस्ट १९९९ रोजी शिवसेनेत गेले. पण त्यानंतर ते राजकारणातून निवृत्त झाले. २०१३ साली दि. बा. पाटील पंचतत्वात विलिन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येनं लोकांनी गर्दी केली होती.