“चार ठिकाणी बॉम्ब ठेवलाय..”, मुंबईच्या ‘या’ हॉटेलला मिळाली घातपाताची धमकी!

WhatsApp Group

bomb threat call to Mumbais hotel : मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं हॉटेलमध्ये फोन करून हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचं सांगितलं आणि ते निकामी करण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केली. पोलिसांनी याप्रकरणी कलम ३८५, ३३६ आणि कलम ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील ‘ललित’ हॉटेल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.

यापूर्वी आलाय एक मेसेज!

मुंबईला पुन्हा हादरवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज आला आहे. मुंबईला उडवण्याची पूर्ण तयारी असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. कधीही हल्ला होऊ शकतो. हा हल्ला २६/११ च्या हल्ल्यासारखा असेल, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीनं म्हटलं आहे. या मेसेजनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. प्राथमिक तपासात हा मेसेज पाकिस्तानच्या क्रमांकावरून आल्याचं निष्पन्न झालं आहे.

हेही वाचा – भांडण की दुसरं काही? कृष्णा अभिषेकनं का सोडला ‘द कपिल शर्मा शो’?

मेसेजमध्ये काय म्हटलंय?

तुम्ही मला तपासाल तर लोकेशन पाकिस्तान दाखवेल, पण बॉम्बस्फोट मुंबईत होईल, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मेसेजमध्ये लिहिलं, आहे की सहा जण भारतात हा हल्ला करतील. मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५०६ (२) अन्वये वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विरार परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमकीच्या मेसेजवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही धमकीच्या संदेशाची बाब अत्यंत गांभीर्यानं घेतली आहे. सुरक्षा यंत्रणांना तपासाबाबत माहिती देण्यात आली आहे.

मुंबई पोलीस सक्रिय

त्याचवेळी मुंबई सीपींनी या प्रकरणाबाबत सांगितलं, की काल रात्री मुंबईच्या वाहतूक पोलीस नियंत्रणाला काही संदेश आले आहेत, ज्यामध्ये दहशत पसरवण्याबाबत धमक्या दिल्या जात आहेत. धमकी देणाऱ्यांचे काही साथीदार भारतातही सक्रिय असल्याचे या संदेशात सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानमधून फोन नंबर हॅक केला जाऊ शकतो. या क्रमांकाचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेनं तपास सुरू केला आहे. याप्रकरणी मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं की, आमच्याकडे आतापर्यंत जी काही माहिती आहे, ती आम्ही एटीएस महाराष्ट्रला दिली आहे.

हेही वाचा – “मला तुझी जर्सी दे”, चाहत्याची मागणी ऐकताच शिखर धवननं काय केलं बघा; तुम्हीही हसाल!

मुंबईचे सीपी विवेक फणसाळकर म्हणाले, ”मी तुम्हाला खात्री देतो की मुंबई पोलीस हे प्रकरण हलक्यात घेणार नाहीत, आम्ही या प्रकरणाचा पूर्ण तपास करत आहोत. आम्ही ‘सागर कवच’ मोहीम सुरू केली असून सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी यंत्रणांना सतर्क केलं आहे. आम्ही कोणतीही शक्यता नाकारत नाही.”

केंद्रीय यंत्रणांकडून चौकशीची अजित पवारांची मागणी

मुंबई पोलिसांना २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी देणारे संदेश गांभीर्यानं घेतलं पाहिजेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शनिवारी सांगितलं. या प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. राज्याचं पोलीस खातं अशी परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे, परंतु केंद्रीय यंत्रणांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे.

शिर्डीतून एकाला अटक

महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी शिर्डी येथून पंजाब पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाखाली बसवलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली. एटीएसच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की पंजाब पोलिसांसह संयुक्त कारवाईत एटीएसनं अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी शहरात शोध मोहीम सुरू केली. याच क्रमानं राजेंद्र नावाच्या आरोपीला पहाटे अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment