मोठी बातमी! मुंबईत 27 जूनपर्यंत जमावबंदी; ‘या’ गोष्टी करण्यास मनाई!

WhatsApp Group

Mumbai Police : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 27 जून 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, वाद्य बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाह प्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

हेही वाचा – कारचा AC चालवल्याने इंजिनचे आयुष्य कमी होते का? जाणून घ्या!

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलीसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहे.

राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे ड्रोन, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 16 जुलै 2023 पर्यंत लागू करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे अशांसाठी हा आदेश शिथिल असेल.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment