स्वातंत्र्यदिनी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ३ तासात ठार मारण्याची धमकी कुणी दिली?

WhatsApp Group

Mukesh Ambani family gets death threat : स्वातंत्र्यदिनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला तीन तासात जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. ही धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. आज सोमवारी (१५ ऑगस्ट) ५६ वर्षीय विष्णू विभू भौमिक यानं सतत फोन करून अंबानी कुटुंबाला धमकी दिली. डीसीपी निलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पकडलेला हा व्यक्ती व्यवसायानं ज्वेलर्स असून त्याचं दक्षिण मुंबईत दुकान आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये कॉल करताना त्यानं आपलं नाव अफजल सांगितलं होतं. तो दहिसरचा रहिवासी आहे.

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलला आठ कॉल!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक डिस्प्ले नंबरवर आठ धमकीचे कॉल आले होते. फोन करणाऱ्यानं मुकेश अंबानींच्या संपूर्ण कुटुंबाला तीन तासांत जीवे मारण्याची धमकी दिली होती. रुग्णालय व्यवस्थापनानं याप्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी तीन पथकं तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. कॉलर एकच असून त्यानं सलग आठ कॉल केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. यानंतर फोन करणाऱ्याचं लोकेशन ट्रेस करून त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याची चौकशी अजूनही सुरू आहे

मुकेश अंबानी यांचं नाव घेऊन धमकी

“आम्ही हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करत होतो, तेव्हा एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. फोन करणारे आमच्या चेअरमनचे नाव घेऊन धमकावत होते. यानंतर सकाळी १०.४५ ते दुपारी १२ वाजेदरम्यान रुग्णालयाच्या सार्वजनिक क्रमांकावर अज्ञात क्रमांकावरून आठ ते नऊ कॉल आले. कॉल आल्यानंतर आम्ही मुंबई पोलिसांना कळवलं. याप्रकरणी डीबी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती”, असे एचएन रिलायन्स हॉस्पिटलचे सीईओ डॉ. तरंग ग्यानचंदानी म्हणाले. दहिसर परिसरातून संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती नुकतीच मिळाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – Independence Day : आपला ‘तिरंगा’ कुणी बनवलाय? इतिहास वाचूनच ‘भारी’ वाटेल!

पकडलेला आरोपी मानसिकदृष्ट्या विक्षिप्त

”प्राथमिक चौकशीत कॉलर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं दिसून आलं. मात्र, त्याची सविस्तर चौकशी होणे बाकी आहे”, असं पोलिसांनी सांगितलं. यापूर्वी अंबानी यांना धमकीची तक्रार मिळताच मुंबई पोलीस सतर्क झाले होते. पोलीस आयुक्तांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर अंबानी कुटुंब आणि त्यांचं घर ‘अँटिलिया’ची सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.

मुकेश अंबानींसाठी Z+ आणि नीता अंबानींसाठी Y+ सुरक्षा

हिजबुल मुजाहिद्दीनकडून धमक्या आल्यानंतर मुकेश अंबानी यांना २०१३ मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारनं Z+ सुरक्षा देऊ केली. २०१६ मध्ये केंद्र सरकारनं त्यांची पत्नी नीता अंबानी यांना Y+ सुरक्षा प्रदान केली होती. त्यांच्या मुलांनाही महाराष्ट्र सरकारकडून सुरक्षा दिली जाते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment