MNS on Vinod Argyle : कामाठीपुरा येथे महिलेला मारहाण करणारे मनसे पदाधिकारी विनोद अरगिले यांची मनसेनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही माफी मागितली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या पत्रकात मनसे पदाधिकाऱ्याच्या वतीनं महिलेवर झालेल्या मारहाणीमुळं मन अस्वस्थ झाल्याचं म्हटलं आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीच महिलांचा आदर केला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसे कडक आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेची चांगली दखल घेत पक्षाचे कामाठीपुरा येथील उपविभाग प्रमुख विनोद अरगिले यांना पक्षातून बाहेर काढण्यात आलं आहे.
मनसेवर झाले आरोप..
महिलेवर झालेल्या मारहाणीचं प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. मनसे पदाधिकाऱ्याच्या वतीनं झालेल्या मारहाणीबाबत मनसेवर प्रतिक्रियांचा पूर आला होता. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटानं मनसेवर तिखट टीका केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. या मारहाणीची दखल घेत महिला आयोगानं पोलिसांना नोटीसही पाठवली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. शुक्रवारी शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर आणि आमदार मनीषा कायंदे यांनी पीडितेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली.
हेही वाचा – Asia Cup 2022 : टीम इंडियाला जबर धक्का..! रवींद्र जडेजा स्पर्धेबाहेर; ‘या’ अष्टपैलू खेळाडूला संधी!
#WATCH | A video went viral showing a man hitting & pushing a woman in Kamathipura, Mumbai on Aug 28, allegedly over installing a bamboo stick (for an ad) in front of woman's shop without consent. A non-cognizable offence lodged at Nagpada PS:Mumbai Police
(Note:Strong language) pic.twitter.com/9PinhzGuyj
— ANI (@ANI) September 1, 2022
याप्रकरणी महिलेच्या तक्रारीच्या आधारे नागपाडा पोलिसांनी गुरुवारी विनोद अरगिले यांच्यासह राजू अरगिले आणि सतीश लाड या आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून त्यांना अटक केली. शुक्रवारी, आरोपींना शिवडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना प्रत्येकी १५,००० रुपयांवर वैयक्तिक जामीन मिळाला.
नक्की प्रकरण काय?
दुकान चालवणाऱ्या त्या वृद्ध महिलेचे प्रकाश देवी असं आहे. मनसेचे विनोद अरगिले आणि त्यांचे सहकारी परिसरात लाकडी खांब उभे करत होते. महिलेच्या दुकानासमोर एक खांबही लावण्यात आला होता. ज्याला तिनं विरोध केला. यावरून वादावादी झाली. यावेळी विनोद यांनी महिलेला कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी विनोद अरगिले यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. ”त्यांनी मला कानाखाली मारली आणि ढकललं. मी सध्या गुन्हा नोंदवला आहे. पोलीस तपास करत आहेत. त्यांना माझ्या दुकानाबाहेर बॅनर लावायचे होते. मी नकार दिला आणि त्यांना कुठेतरी ठेवण्यास सांगितले. यावर त्यानं मला मारहाण केली. हे कोणत्याही महिलेसोबत होऊ नये”, असं प्रकाश देवी म्हणाल्या.