Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होण्याची शक्यता महाराष्ट्राच्या हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कधी पाऊस तर कधी कडक उन्हाने नागरिकांची तारांबळ उडवली आहे. एप्रिल महिना संपत आला असला तरी अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने शुक्रवारी (28 एप्रिल) विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे आधीच अवकाळी हवामानाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, उत्तर कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी (27 एप्रिल) सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर यवतमाळमध्ये 16.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सध्या मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू आहे.
हेही वाचा – Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त? वाचा!
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया येथे गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. सध्या या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलढाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला यासह 17 जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!