Swachh Survekshan Awards 2022 : ‘स्वच्छ सर्वेक्षण – २०२२’ अंतर्गत पाचगणीला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा तर कराड शहराला याच श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई महानगर पलिका आणि देवळाली कटक मंडळाचाही (कॅन्टॉनमेंट बोर्ड) राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणींमध्ये राज्याला आज एकूण २३ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने येथील तालकटोरा स्टेडियमध्ये ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-२०२२’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध श्रेणीतील सर्वोत्तम १२ पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर आणि सचिव मनोज जोशी यावेळी उपस्थित होते.
President Droupadi Murmu presented the Swachh Survekshan Awards 2022 at a function held in New Delhi today.
Details: https://t.co/6UWYlGteuw pic.twitter.com/k6OecPx7kz
— President of India (@rashtrapatibhvn) October 1, 2022
पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर
महाराष्ट्रातील तीन शहरांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देशातील १ लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांच्या श्रेणीत सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराने उत्तम कामगिरी करत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. याच श्रेणीत कराड नगरपरिषदेला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या उभय शहरांनी शहर स्वच्छता आणि सुशोभीकरणात उत्तम कामगिरी केली असून स्थानिकांचाही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई शहराला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
हेही वाचा – इंडोनेशियात फुटबॉल स्टेडियममध्ये मृत्यूचं तांडव..! मॅचनंतर १७४ लोकांचा अंत; पाहा घटनेचा VIDEO
Gujarat's Surat has been ranked as the 2nd cleanest city and Maharashtra's Navi Mumbai ranked as the 3rd cleanest city in India in the Swachh Survekshan 2022 Awards: Ministry of Housing and Urban Affairs
— ANI (@ANI) October 1, 2022
राष्ट्रपतींच्या हस्ते देवळाली कटक मंडळाचा सन्मान
देशातील एकूण ६२ कटक मंडळांमध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नाशिकमधील देवळाली कटक मंडळाला सर्वोत्तम कटक मंडळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महासंचालक अजय कुमार शर्मा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’चा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान
१०० नागरी स्थानिक स्वराज संस्थांपेक्षा जास्त संख्या असलेल्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुध्द देवळीकर आणि अन्य अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारांसोबतच अहमदनगर कटकमंडळ, बारामती, भोकर, गडचिरोली, गेवराई, कर्जत, कुरखेडा, लोणावळा, मिराभाईंदर, मुर्गुड, नरखेड, पंढरपूर, पन्हाळा, पिंपरी चिंचवड, रहिमतपूर, सासवड, शेलू आणि श्रीरामपूर या शहरांनाही विविध श्रेणींमध्ये केंद्रीय गृहनिर्माण व शहरी राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.