Lumpy Virus : राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा २५५२ पशुपालकांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी रु. ६.६७ कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले, लम्पी चर्मरोगाच्या विषाणूच्या जनुकीय परीक्षणांतर्गत जिनोम क्रमवारिता तपासणीसाठी (Genome sequencing) आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे (National Institute of Virology (NIV) येथे पाठविण्यात आले. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे.”
सिंह म्हणाले, ”तसेच लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने ७ विभागांमधून प्रतिविभाग दोन गावातील पशुधनातील लसीकरणापूर्वीचे नमुने व लसीकरणानंतरचे ७, १४, २१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करुन ते बंगळूरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्था (National Institute Of Veterinary Epidemiology And Disease Informatics (NIVEDI) येथे पाठवण्यात आले आहेत. त्यांचे निष्कर्ष देखील नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.”
हेही वाचा – T20 World Cup 2022 : झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंना किती पैसे मिळतात? आकडा वाचून बसेल धक्का!
राज्यामध्ये २९ ऑक्टोबर २०२२ अखेर ३३ जिल्ह्यांमधील एकूण ३१७६ गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण १६१६०९ बाधित पशुधनापैकी एकूण १०५६०७ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण १४०.९७ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण १३६.१५ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे ९७.३२% गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे सिंह यांनी सांगितले.