Maharashtra government cabinet expansion portfolio : महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर ४० दिवसांनी ९ ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९-९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र विभागांचं विभाजन झालं नव्हतं. आता सर्व मंत्र्यांना त्यांची खाती देण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह आणि अर्थ मंत्रालय मिळालं आहं.
एकनाथ शिंदेंकडं कोणती खाती?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खात्यांचं वाटप जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांकडं सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), वाहतूक, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, अल्पसंख्याक व औकाफ, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व हवामान या खात्यांचा समावेश आहे.
हेही वाचा – “ट्रकनं कट मारला आणि…” नेमका कसा झाला विनायक मेटेंच्या कारचा अपघात?
फडणवीसांकडं महत्त्वाची खाती!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त आणि नियोजन, कायदा व न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण आणि ऊर्जा ही खाती असतील. एकनाथ शिंदेंकडं ११ खाती असली तरी राज्यातील सर्वाधिक महत्त्वाची खाती ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहेत. महाराष्ट्रात भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात, विजय कुमार गावित आणि अतुल सावे यांचा समावेश होता. तर एकनाथ शिंदे कॅम्पमधून दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, संजय राठोड, संदिपान भुमरे यांनी शपथ घेतली.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे सरकार पाडले आहे. यानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसंच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून दोघेही द्विसदस्यीय मंत्रिमंडळ म्हणून काम करत होते. यावर विरोधकांकडून सातत्यानं टीका होत होती.
Radhakrishna Vikhe Patil gets Revenue, Animal Husbandry & Dairy; Sudhir Mungantiwar gets Forest, Cultural affairs & fisheries; Chandrakant Patil gets Higher, technical education, textile industry & parliamentary work; Shambhuraj Desai gets State Excise Duty pic.twitter.com/lSviDapnN8
— ANI (@ANI) August 14, 2022
इतर मंत्र्यांकडं देण्यात आलेली खाती
- राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास.
- चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य खातं.
- सुधीर मुनगंटीवार – सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्य व्यवसाय.
- डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास.
- गिरीष महाजन – वैद्यकीय शिक्षण, ग्राम विकास आणि पंचायती राज, क्रीडा व युवक कल्याण.
- गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता.
- दादा भुसे – बंदरे व खनिकर्म.
- संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन.
- सुरेश खाडे – कामगार.
- संदीपान भुमरे – फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना.
- उदय सामंत – उद्योग.
हेही वाचा – ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवालांची ‘एक’ इच्छा, जी अपूर्ण राहिली!
- तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण.
- रवींद्र चव्हाण – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).
- अब्दुल सत्तार – कृषी.
- दीपक केसरकर – शालेय शिक्षण आणि मराठी भाषा.
- अतुल सावे – सहकार, इतर मागास आणि बहुजन कल्याण.
- शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क.
- मंगलप्रभात लोढा – पर्यटन, महिला आणि बालविकास, कौशल्य विकास आणि उद्योजकता.