मी पुन्हा देईन…पुन्हा देईन! मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का; राज्यपालांना दिलं पत्र!

WhatsApp Group

CM Eknath Shinde on MLC Nomination List : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची सूत्रं हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंना आता मोठा झटका दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारचं ते पत्र नाकारण्याची विनंती राज्यपालांना केली आहे. त्यात महाविकास आघाडी सरकारनं विधान परिषद सदस्यासाठी १२ जणांची नावं राज्यपालांकडे पाठवली होती. शिंदे यांनी गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. शिंदे सरकार लवकरच नवीन नावांची यादी राज्यपालांना देईल, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री शिंदेची ही मागणी मान्य करुन जुनी यादी मागेही घेतली आहे. त्यामुळं हा महाविकास आघाडीतील पक्षांसाठी जबर धक्का मानला जात आहे.

राज्यपालांना विधान परिषदेच्या सदस्याची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत नोव्हेंबर २०२० मध्ये उद्धव ठाकरे सरकारनं १२ जणांची यादी राज्यपालांना पाठवली. ही नावं एमएलसी म्हणून नियुक्त करावीत, अशी विनंतीही करण्यात आली होती. मात्र, या यादीवर राज्यपालांकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनंही याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा – “यंदा दसरा मेळाव्याला बोलावलं तर मी पण…”; नारायण राणेंच्या ‘थेट’ वक्तव्यामुळं वाद वाढणार?

ठाकरे आणि शिंदे पुन्हा आमनेसामने

शिवाजी पार्कवर ५ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले आहेत. शिंदे गटाचे माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी १ सप्टेंबर रोजी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी बीएमसीकडे अर्ज केला होता. तर उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी २२ ऑगस्टलाच दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला आहे. बीएमसी जी नॉर्थ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितलं की, शिवाजी पार्कमध्ये कोणाची रॅली काढायची यावर १० सप्टेंबरनंतर निर्णय घेतला जाईल. जो निर्णय होईल तो नियमानुसारच होईल.

हेही वाचा – Sonali Phogat Murder : सगळं ठरवूनच केलं..! पीए सांगवानचा हत्येप्रकरणी खुलासा; म्हणाला, “गोव्यात कुठलीही…”

दसरा मेळावा ही शिवसेनेची ओळख

शिंदे गटाचे आमदार सरवणकर म्हणाले, ”मी दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी बीएमसीमध्ये अर्ज करतो, तसाच यंदाही अर्ज केला आहे. मी शिवसेनेच्या वतीनं अर्ज केला आहे.” दुसरीकडे ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ”दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. रॅलीला परवानगी फक्त आम्हालाच मिळेल. शिंदे गट कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment