CM Eknath Shinde On Covid Situation : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन, पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा – जॉब नसणाऱ्यांसाठी खुशखबर..! मुंबईत ‘इथं’ होतोय रोजगार मेळावा; वाचा संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव उपाययोजनांची आढावा बैठक सुरू झाली आहे. नागपूर विधानभवनात ही बैठक सुरू आहे. pic.twitter.com/rtMaLHRYgN
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 22, 2022
राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रूग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.