Lumpy Skin Disease : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले,अशा पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २५.३१ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. २६.११.२०२२ अखेर ३४ जिल्ह्यांमधील एकूण ३७७५ संसर्गकेंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ३०९०६४ बाधित पशुधनापैकी एकूण २२९६५९ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी २१२६५ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १४४.१२ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १३८.७७ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे ९९.१७ % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘या’ बँकेच्या ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे..! १२ डिसेंबरपूर्वी करून घ्या ‘हे’ काम
रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले आहे. या दोन्ही पद्धती लंपी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना सिंह यांनी दिल्या आहेत.
लसीकरण न केलेल्या आणि लंपी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या उक्त नमूद वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहन सिंह यांनी केले.