मराठी इंडस्ट्रीची झोप उडेल, असा व्हिडिओ ‘कोकण हार्टेड गर्ल’ने पोस्ट केलाय!

WhatsApp Group

Kokan Hearted Girl Meet Manmohan Mahimkar : ‘कोकण हार्टेड गर्ल’ नावाने ओळखली जाणारी अंकिता वालावलकर आणि तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर किती चालतात, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. तिच्या तोंडची मालवणी भाषा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन जाते. कॉमेडी, माहिती देणारे, निसर्ग सौंदर्य दाखवणारे तिचे व्हिडिओ पाहून मनाला बरं वाटतंच, पण तिचा लेटेस्ट व्हिडिओ पाहून मराठी लोकांना नक्कीच वाईट वाटेल, कदाचित तुमचे मनही गहिवरेल.

अंकिताने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तिची आणि ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहीमकर यांची गिरगावात एका शूटिंगदरम्यान गाठभेट झाली. आपल्याला मनमोहन माहीमकर कदाचित नावाने कमी आणि चेहऱ्याने जास्त ठाऊक असतील. यांना जुन्या मराठी सिनेमांत भूमिका साकारताना पाहिलंय, असं प्रत्येकाला वाटेल. शूटिंगदरम्यान माहीमकर यांनी आपली सध्याची बिकट परिस्थिती अंकिताला सांगितली आणि अंकितानेही त्यांचा मान ठेवत मदत करण्याचे आश्वासन दिले.

काय बोलले माहीमकर?

भेट होताच आमच्या शूटिंगमध्ये याल का, असं अंकिताने विचारताच माहीमकरांनी लगेच होकार दिला. शूटिंग संपलं आणि त्यांनी अंकिताला म्हटलं, ”मुली माझ्यासाठी काही काम मिळेल का? मला कामाची खूप गरज आहे. माझं लग्न झालेलं नाही, वेळ घालवायला माझं कुटुंबही नाही. मला इच्छामरणही चालेल, पण या देशात तशी सोय नाही. मला नुसत्या पैशाची गरज नाही. मला काम द्या जेणेकरून माझा वेळ जाईल.”

हेही वाचा – Debit Card : डेबिट कार्डवर मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा, ‘असा’ करा क्लेम!

मनाला लगेच ठोसा मारतील, असे माहीमकरांचे शब्द ऐकून अंकितानेही त्यांना शक्य तितकी मदत करण्याविषयी सांगितले. तुम्हाला काम देईन, इतकी मी मोठी नाही, पण इंडस्ट्रीतील ओळखीने आहे तेवढं करेन, असे अंकिताने त्यांना सांगितले. तिचा हा व्हिडिओ खरंच मन हेलावणारा आहे. 2020 मध्येही माहीमकरांची अवस्था समोर आली होती.

नानामामा, गोलमाल, जत्रा, भिकारी, ही पोरगी कोणाची, यंदा कर्तव्य आहे, वंटास यांसारख्या मराठी चित्रपटात आणि नाटकात दिसलेला हा अभिनेता आणखी किती काळ तग धरेल? तात्पुरती मदत कितीशी पुरेल? त्यांच्यासारख्या इतर अभिनेत्यांचं काय होतं असेल? वडाच्या झाडाप्रमाणे वाढणारी मराठी सिनेसृष्टी, चित्रपट महामंडळ, मराठी कलाकार संघटना अशा अभिनेत्यांसाठी काहीच करू शकणार नाही का? वय झालं की ओळख पुसटली जाते का? असे अनेक प्रश्न अंकिताच्या एका व्हिडिओने चटकन डोळ्यासमोर येतात. एक माध्यम म्हणून आपणही काही देणं लागतो, याची जाणीव लगेच करून दिली म्हणून अंकिताच्या या व्हिडिओचे नक्कीच आभार मानायला हवेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment