Kargil Vijay Diwas 2022 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं पहिलं ट्वीट जवानांसाठी; म्हणाल्या, “असामान्य…”

WhatsApp Group

मुंबई : दरवर्षी २६ जुलै हा कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. खरं तर १९९९ मध्ये पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी आणि सैनिक गुप्तपणे कारगिलच्या डोंगरात घुसले होते. या घुसखोरीच्या विरोधात भारतीय लष्करानं ‘ऑपरेशन विजय’ सुरू केलं आणि प्रत्येक घुसखोराला ठार केलं आणि काहींना पळून जाण्यास भाग पाडलं. या युद्धाला २३ वर्षे झाली आहेत. या वर्षी आपण २३वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहोत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी शहीद जवानांचं स्मरण करत त्यांच्याबद्दल ट्वीट केलं आहे.

मुर्मूंनी काय लिहिलं?

द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीटमध्ये लिहिले, ”कारगिल विजय दिवस हा आपल्या सशस्त्र दलांच्या असामान्य शौर्याचं, पराक्रमाचं आणि दृढनिश्चयाचं प्रतीक आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूर सैनिकांना मी नमन करते. तमाम देशवासी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सदैव ऋणी राहतील. जय हिंद.”

राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचं हे पहिलंच ट्वीट आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सोमवारी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. यशवंत सिन्हा यांचा पराभव करून द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. मुर्मू यांनी यापूर्वी कारगिल विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला देशाला शुभेच्छा दिल्या होत्या, हा दिवस देशाच्या सशस्त्र दलांच्या शौर्याचं प्रतीक आहे, असं सांगून त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचं स्मरण करून स्वतंत्र भारतातील नागरिकांशी संवाद साधला.

कशासाठी कारगिल विजय दिवस?

१९७१ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील अणुचाचणीमुळं तणाव अधिक वाढल्याचंही बोललं जातं. त्यानंतर दोन्ही देशांनी लाहोरमध्ये करारावर स्वाक्षरीही केली पण पाकिस्ताननं आपली कारवाई सोडली नाही आणि आपल्या सैनिकांना लपवून एलओसी ओलांडण्याचा प्रयत्न केला. सियाचीनमधून भारतीय सैन्याला हटवणें, काश्मीर-लडाखमधील दुवा तोडणं हे या पाकिस्तानी सैनिकांचं काम होते. भारतानं परिस्थिती शांततेनं हाताळण्याचा प्रयत्न केला पण पाकिस्ताननं ऐकलं नाही, त्यानंतर भारत सरकारनं ऑपरेशन विजय सुरू केलं आणि सुमारे दोन लाख सैनिक पाठवले. जवळपास दोन महिने चाललेल्या या युद्धात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, या युद्धात भारताचेही नुकसान झाले. या युद्धात भारताचे ५०० हून अधिक जवान शहीद झाले. याशिवाय १३०० ते १४०० जवान जखमीही झाले आहेत. भारताच्या अनेक शूर सैनिकांना प्राण गमवावे लागले, पण ते आपल्या जमिनीपासून एक इंचही मागं हटले नाहीत. दरवर्षी कारगिल विजय दिवसानिमित्त देशाच्या शूर सैनिकांचं स्मरण करून त्यांच्या शौर्याच्या गाथा सर्वत्र सांगितल्या जातात.

Leave a comment