IAS officer Tukaram Mundhe : आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला आहे. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी विविध आरोग्य कार्यक्रम व कार्यालयीन व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य आयुक्तालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामपातळीपर्यंत सार्वत्रिक, सहजसाध्य व माफक आरोग्य सेवा राज्यातील जनतेला पुरविण्याच्या दृष्टीने आरोग्याच्या सर्व निर्देशांकांवर उत्कृष्ठ कामाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असून शासकीय आरोग्य संस्था २४ तास कार्यरत राहतील, आरोग्य सेवांपासून राज्यातील कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
हेही वाचा – “गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार!
महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी ४४ आयएएस अधिकार्यांच्या (IAS Officer) बदल्यांची ऑर्डर जारी करण्यात आली होती. यामध्ये मुंढेसोबत मनिषा म्हैसकर, अभिजीत बांगर, राजेश नार्वेकर यांचा समावेश आहे. मनिषा म्हैसकर यांना मंत्रालयात प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर अभिजीत बांगर हे ठाणे महानगरपालिका आयुक्त असणार आहेत. संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांना नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त करण्यात आले आहे.