Foxconn Vedanta Plant : महाराष्ट्रातून कोट्यवधींचा प्रकल्पही गेला आणि लाखो नोकऱ्याही गेल्या!

WhatsApp Group

Foxconn-Vedanta Semiconductor Plant : महाराष्ट्राऐवजी, गुजरातला १.५४ लाख कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे, ज्यामध्ये भारताला सेमीकंडक्टरच्या निर्मितीमध्ये स्वावलंबी बनवण्याची क्षमता आहे. थेट एक ते दीड लाख आणि अप्रत्यक्षरीत्या यापेक्षा कितीतरी पट अधिक रोजगार निर्माण करणारा भारतीय कंपनी वेदांत आणि तायवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉनचा हा प्रकल्प पुण्यातील तळेगावऐवजी अहमदाबादजवळील धोलेरा येथे गेला आहे. भारताला इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत आर्थिक महासत्ता बनवण्याची ताकद असलेला आणि तैवानचा फॉक्सकॉन आणि भारताचा वेदांत यांच्यातील करारातून बाहेर पडणारा हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये का गेला, याचं उत्तर या लेखात तुम्हाला मिळेल.

महाराष्ट्र आता या प्रश्नांची कारणं शोधत आहे. या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळेपर्यंत महाराष्ट्र गुजरातपेक्षा किमान २० वर्षे मागे असेल, असे उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. हा प्रकल्प म्हटला, की देशाच्या ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे नशीब आणि चित्र बदलणार आहे. आज ज्याप्रमाणे जगातील सॉफ्टवेअर मार्केटमध्ये भारत एक जागतिक महासत्ता बनला आहे, त्याचप्रमाणे आगामी काळात भारत सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीमध्ये स्वावलंबी होताच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं उत्पादन केंद्र बनेल. लाखो तरुणांना नोकऱ्या मिळतील आणि भारतातील कोणत्याही राज्याला सर्वाधिक फायदा होणार असेल तर तो महाराष्ट्र नव्हे तर गुजरातला होईल.

हेही वाचा – VIDEO : सांगलीत साधूंना बेदम मारहाण..! पोरामुळं ‘एक’ अफवा पसरली आणि लोकांनी काठ्याच काढल्या

महाराष्ट्र गुजरातच्या मागे का राहिला?

मंगळवारी गुजरात सरकार आणि वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप यांच्यात १ लाख ५४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प आणण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. २६ जुलै २०२२ रोजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कंपन्यांशी या प्रकल्पाबाबत चर्चा करून महाराष्ट्रात सरकार बदलताच महाराष्ट्राबाहेर न जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात, ही तीन राज्ये जोरदार प्रयत्न करत होती. पण बाजी गुजरातनं मारली. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात जगात कर्नाटकचं स्थान आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुजरात लवकरच जगात स्थान मिळवेल. महाराष्ट्र फक्त या दोघांना पाहत राहणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सेमी कंडक्शनचं धोरण करणारं गुजरात हे देशातील एकमेव राज्य आहे. फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला जाण्यामागं हे सर्वात मोठं कारण आहे. गुजरातनं सेमी कंडक्शनशी संबंधित धोरण केलं. या धोरणांतर्गत, गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या योजना तयार करण्यासाठी राज्य इलेक्ट्रॉनिक मिशन तयार करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत येणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांना अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली.

हेही वाचा – होय महाराजा! पंतप्रधानांनी घेतली कोकणातील ‘बापर्डे’ ग्रामपंचायतीची दखल; देशपातळीवर झळकणार गाव!

शिंदे सरकार स्थापन होण्याच्या आधी…

गुजरात सरकारनं फेब्रुवारी महिन्यापासूनच गुंतवणुकीची तयारी केली होती. या धोरणामुळं या कंपन्यांनी सेमी कंडक्टर बनवण्यासाठी गुजरात सरकारशी संपर्क साधला. या कंपन्यांची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबतची शेवटची बैठक शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्याच्या तीन दिवस आधी झाली होती. मंगळवारी केवळ करारावर स्वाक्षरी करण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

तळेगाव, पुण्यात प्रकल्प आणण्यासाठी महाराष्ट्रानं फॉक्सकॉन आणि वेदांतला ३९ हजार कोटींची सूट देऊ केली होती, तर गुजरातनं केवळ २९ हजार कोटी देऊ केले आहेत. याशिवाय महाराष्ट्र सरकार तळेगावात ११०० एकर जमीन, इतर अनुदान आणि सुविधा देत होतं. असं असतानाही वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये आणण्याची घोषणा केली आणि या एकाच कारणामुळं महाराष्ट्र गुजरातच्या जवळपास २० वर्षांनी मागे गेला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment