दिलीप कुमार ‘त्या’ गोष्टीसाठी पाकिस्तानात गेले आणि बाळासाहेबांनी मैत्रीच तोडून टाकली!

WhatsApp Group

Friendship Day : आज आपल्याकडं फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीचा दिवस साजरा केला जात आहे. या खास दिनी मित्रांची आठवण काढली जाते. राजकारण आणि सिनेसृष्टी अशा दोन्ही क्षेत्रात मैत्री किती टिकून आहे, हे आपण पाहिलं आहे. अशीच मैत्री दिलीप कुमार आणि शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची होती. सदाबहार अभिनेते म्हणून दिलीप कुमार यांचं नाव घेतलं जातं. वयाच्या ९८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर २०१२ मध्ये अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं बाळासाहेब ठाकरेंचं मुंबईत निधन झालं. या दोघांच्या मैत्रीतील एक किस्सा नेहमी सांगितला जातो.

बाळासाहेब ठाकरेंशी घट्ट मैत्री

दिलीप कुमार यांची काँग्रेसशी जवळीक असेल, पण बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री होती. दोघांची मैत्री शिवसेनेच्या स्थापनेपूर्वीपासून सुरू झाली होती. रशीद किडवई लिहितात, ”बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीना ताई या दिलीप कुमार यांच्या फॅन होत्या. दिलीप कुमार त्यांच्याकडं अनेकदा जायचे तेव्हा ताई त्यांच्या आवडीचं जेवण बनवायच्या.” बाळासाहेब आणि दिलीप कुमार जुन्या ‘मातोश्री’च्या गच्चीत बसून गप्पा मारायचे, एकत्र बियर प्यायचे.

संबंध बिघडले..

१९९८-९९ दरम्यान बाळासाहेब आणि दिलीप कुमार यांच्यातील संबंध थोडेसे बिघडले, याचं कारण एक पुरस्कार होतं. खरं तर पाकिस्ताननं दिलीप कुमार यांना स्वतःचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान-ए-इम्तियाज देण्याची घोषणा केली. दिलीप कुमार हे पुरस्कार घेण्यासाठी पाकिस्तानला जाणार होते. याला ठाकरे यांनी विरोध करत पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. दिलीप कुमार खूप घाबरले होते. त्यांना सर्वात जास्त वाईट याचं वाटत होतं की तीन दशकांपासून त्यांचा मित्र असलेल्या एका व्यक्तीकडून त्यांच्या देशभक्तीवर शंका घेतली जात आहे.

हेही वाचा – भारताशिवाय १५ ऑगस्टला स्वतंत्र झालेले देश माहितीयेत का? वाचा या दिवसाबद्दलच्या रंजक गोष्टी!

वाजपेयींची मदत

यानंतर दिलीप कुमार यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडं मदत मागितली. वाजपेयींनी त्यांना बाळासाहेब ठाकरेंचे शब्द मनावर घेऊ नये असं सांगितलं. वाजपेयी म्हणाले, की दिलीप कुमार एक कलाकार आहेत आणि त्यांनी राजकीय अडचणीत पडू नये. बक्षीस घेतलं पाहिजे. त्यानंतर दिलीपकुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ते सुनील दत्त यांनाही सोबत घेऊन पाकिस्तानला गेले.

१९९९च्या कारगिल युद्धादरम्यान हे प्रकरण पुन्हा एकदा तापलं. त्यानंतर ठाकरे यांनी दिलीप कुमार यांना पुरस्कार परत करण्याची मागणी केली परंतु दिलीप कुमार यांनी गरिबांना मदत केल्याचं सांगत पुरस्कार परत करण्यास नकार दिला. या पुरस्कारामुळं भारत आणि पाकिस्तानमधील दरी कमी होण्यास मदत होईल, असा विचार दिलीप कुमार यांचा होता. ”मला हे आवडलं नाही कारण दिलीपला हिंदुस्ताननं मोठं केलं पाकिस्ताननं नाही”, असं बाळासाहेबांनी मैत्री तुटल्यानंतर सांगितलं होतं.

Leave a comment