ED on Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीनं जॅकलिनला आरोपी बनवलं आहे. ताज्या माहितीनुसार, आज ईडी जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठग सुकेश हा गुन्हेगार आणि खंडणीखोर आहे हे जॅकलिनला आधीच माहीत होतं, असा ईडीचा विश्वास आहे.जॅकलिनचे ठग सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ईडीनं जॅकलीनला पूर्णपणे वेठीस धरलं आहे. त्याच वेळी, आता ईडीनं जॅकलिनवर २१५ कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला आहे.
सुकेशकडून जॅकलिनला करोडोंचे गिफ्ट्स
मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशनं जॅकलीनला १० कोटी रुपयांच्या मौल्यवान भेटवस्तू दिल्या. ईडीनं जॅकलिनची ७ कोटींहून अधिकची संपत्तीही जप्त केली आहे. सुकेशनं जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्याचं सांगण्यात आलं आहे. कुटुंबाला दिलेल्या भेटवस्तूंमध्ये कार, महागड्या वस्तू याशिवाय १.३२ कोटी आणि १५ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. जॅकलिन बऱ्याच दिवसांपासून ईडीच्या रडारवर होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ईडीनं जॅकलिनवर आपली पकड घट्ट केली असून तिचं नाव आरोपी म्हणून ठेवलं आहे.
BREAKING :
Bollywood Actor Jacqueline Fernandez to be made an accused in the Suresh Chandrashekhar Extortion case. Chargesheet to be filed Shortly.#JacquelineFernandez #SureshChandrasekhar @pradip103
— Jan Ki Baat (@jankibaat1) August 17, 2022
हेही वाचा – मुंबईत रिक्षा चालवताना ‘ब्रेक’ मिळाला आणि राजू श्रीवास्तव पुढं कॉमेडी किंग ठरला!
यापूर्वी असं सांगण्यात आलं, होतं की ठग सुकेशनं दिल्ली तुरुंगात असताना एका महिलेची २१५ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. यानंतर सुकेशने याच खंडणीच्या पैशातून जॅकलिनला करोडो रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या. भेटवस्तूंमध्ये हिरे, दागिने, ५२ लाख किमतीचा घोडा यासह इतर अनेक महागड्या भेटवस्तूंचा समावेश आहे. सुकेशनं लोकांना फसवून हे सर्व पैसे कमावल्याचं सांगण्यात आलं.
जॅकलीन सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये?
सुकेशनं जॅकलिनला एवढ्या मौल्यवान भेटवस्तू का दिल्या? हा प्रश्न अनेकांना पडला होता. यानंतर जॅकलिन आणि सुकेश एकमेकांसोबत प्रेमसंबंधात असल्याचं समोर आलं. काही काळापूर्वी जॅकलिन आणि सुकेशचे काही इंटिमेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यानंतर लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले होते.
हेही वाचा – ‘रोड हिप्नॉसिस’मुळं विनायक मेटेंचा अपघात? फार भयंकर आहे हा प्रकार; एकदा वाचाच!
जॅकलिनचे आगामी चित्रपट
ईडीच्या कारवाईनंतर एकीकडे जॅकलिन फर्नांडिस वाईटरित्या अडकताना दिसत आहे, तर दुसरीकडं तिचे अनेक चित्रपट येऊ घातले आहेत. यामध्ये तिचे दोन चित्रपट बिग बजेटचे आहेत. राम सेतूमध्ये जॅकलिन बॉलिवूडचा अॅक्शन किंग अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. या चित्रपटात नुसरत भरुचा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत. जॅकलिनच्या या चित्रपटाचे बजेट ८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात जॅकलिनसोबत रणवीर सिंग आणि पूजा हेगडे स्क्रिन शेअर करणार आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.