काय आहे पत्रा चाळ घोटाळा? संजय राऊत कसे अडकले? जाणून घ्या!

WhatsApp Group

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रात्री १२ वाजता त्यांना अटक केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत यांच्या घरातून ११.५ लाखांची रोकड सापडली आहे. राऊत या रोख रकमेचा हिशेब देऊ शकले नाहीत, त्यानंतर ईडीनं ती जप्त केली. शिवसेनेचे डझनभर कार्यकर्ते संजय राऊत यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन करत आहेत. संजय राऊत यांचा दावा आहे, की आपल्याला यात गोवण्यात आलं आहे, आपला या घोटाळ्याशी काहीही संबंध नाही. ही कारवाई राजकीय हेतूनं केली आहे.

काय आहे पत्रा चाळ जमीन घोटाळा?

पत्रा चाळ जमीन घोटाळा २००७ मध्ये सुरू झाला. हा घोटाळा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण (MHADA), प्रवीण राऊत, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) यांच्या संगनमतानं झाल्याचा आरोप आहे. २००७ मध्ये म्हाडानं पत्रा चाळच्या पुनर्विकासाचं काम गुरु आशिष कन्स्ट्रक्शनकडं सोपवलं. गोरेगावच्या सिद्धार्थनगरमध्ये हे बांधकाम होणार होतं. म्हाडाच्या ४७ एकर जागेत एकूण ६७२ घरं बांधण्यात आली आहेत. पुनर्विकासानंतर गुरु आशिष कंपनीला साडेतीन हजारांहून अधिक फ्लॅट बनवून द्यायचे होते. म्हाडासाठी सदनिका बांधल्यानंतर उर्वरित जमीन खासगी विकासकांना विकायची होती. १४ वर्षांनंतरही कंपनीनं लोकांना फ्लॅट दिले नाहीत.

संजय राऊत यांचा संबंध काय?

फ्लॅट बांधण्याऐवजी गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं ४७ एकर जमीन आठ वेगवेगळ्या बिल्डरांना विकल्याचा आरोप आहे. यातून कंपनीला १०३४ कोटी रुपये मिळाले. मार्च २०१८ मध्ये म्हाडानं गुरु आशिष कन्स्ट्रक्शनविरुद्ध एफआयआर दाखल केला. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडं (EOW) पाठवण्यात आलं. EOW नं फेब्रुवारी २०२० मध्ये प्रवीण राऊतला अटक केली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे बोललं जातं. ते कंपनीत सारंग वाधवन आणि राकेश वाधवान यांच्यासह एचडीआयएलमध्ये संचालक होते. वाधवान बंधू पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. प्रवीण राऊतला न्यायालयानं जामीन मंजूर केला होता, मात्र पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीणला ईडीनं अटक केली होती.

हेही वाचा – धक्कादायक..! महिलेला ७० सेकंदात २८ शिव्या; सोशल मीडियावर संजय राऊतांची ऑडिओ टेप?

प्रवीण राऊतला ईडीनं अटक करून चौकशी केली. त्यानंतर सुजित पाटकर यांचं नाव या प्रकरणात आले. सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीनं छापे टाकले. छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रं सापडली आहेत. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत हिनं संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना कर्ज दिल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. हे कर्ज ५५ लाखांचं होतं परंतु बँकेकडून कोणतेही कर्ज न घेता ते पास झालं. वर्षा राऊत यांनी बँकेतून ५५ लाख रुपये घेऊन दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला. या फ्लॅटसंदर्भात ईडीनं वर्षा राऊत यांची चौकशी केली.

संजय राऊतांची मुलगीही..?

म्हाडाच्या जमिनीच्या व्यवहारात प्रवीण राऊत यांना कमिशन म्हणून ९५ कोटी रुपये मिळाल्याचा आरोप आहे. ज्या सुजित पाटकरचं नाव समोर आलं आणि ईडीनं छापा टाकला, त्याचाही संबंध संजय राऊत यांच्याशी जोडला जात आहे. सुजित हे संजय राऊत यांच्या जवळचे मानले जातात. याशिवाय सुजित पाटकर यांची वाईन ट्रेडिंग कंपनी असून, त्यात संजय राऊत यांची मुलगी त्यांची भागीदार आहे.

संजय राऊत म्हणाले.

.पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे सहकारी प्रवीण राऊत यांची ९ कोटी आणि संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांची २ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, ”मी कोणत्याही घोटाळ्यात सहभागी नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे ईडीनं कारवाई केली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेतो की, माझा कोणत्याही घोटाळ्याशी काहीही संबंध नाही. मी मरेन, पण शरण येणार नाही, शिवसेना सोडणार नाही. मी झुकणार नाही.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment