सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांचं नेमकं कशामुळं वाजलं? वाचा इथं!

WhatsApp Group

Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री यांच्या निधनानं कॉर्पोरेट इंडियातील वादही संपुष्टात आला, जो एकेकाळी देशातील मोठमोठ्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला होता. रतन टाटा यांनी सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाचं अध्यक्ष बनवलं होतं, पण त्यानंतर जे घडलं ते इतिहासजमा झालं. हा कॉर्पोरेट वाद २६ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरू झाला. या दिवशी सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. २०१२ मध्ये सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा यांच्या जागी टाटा समूहाची सूत्रे हाती घेतली.

नेमका वाद काय?

सायरस यांनी टाटा ट्रस्टच्या काही अधिकाऱ्यांवर टाटा समूहाच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आणि पडद्याआडून टाटा समूहाच्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. सायरस यांच्या या आरोपांनंतर रतन टाटा आणि सायरस मिस्त्री कुटुंबात निर्माण झालेली कटुता कधीच कमी होऊ शकली नाही. टाटा सन्समध्ये सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडची १८.४ टक्के हिस्सेदारी आहे. सर्वात मोठ्या शेअरहोल्डिंग कंपनीचे प्रतिनिधी असूनही आणि स्वत: रतन टाटांची निवड असतानाही सायरस मिस्त्री यांना कंपनी सोडावी लागली.

खूप उत्साहानं आणि आशेनं रतन टाटा यांनी सायरस यांना आपला उत्तराधिकारी म्हणून नेमलं होतं, पण सगळ्या गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्या. सायरस मिस्त्री यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांना अर्धी मुंबई स्थायिक करणारा माणूस असं म्हटलं जातं. रतन टाटा यांना मूलबाळ नव्हतं, सायरस पारशी आणि तरुण आहे आणि टाटा समूहाला तो दीर्घकाळ उंचीवर नेईल असा टाटांना विश्वास होता. त्याच वर्षी २२ जून २०२२ रोजी पालोनजी मिस्त्री यांचंही निधन झाले. पालोनजी मिस्त्री यांचे सायरस मिस्त्री हे धाकटे पुत्र होते.

रतन टाटा यांच्याशी झालेल्या वादानंतर सायरस यांनी २०१६ मध्ये टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांचा राजीनामा दिला होता. सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या दोन कंपन्यांवर रतन टाटा यांच्या सूचनेनुसार संचालक मंडळानं त्यांच्या विरोधात मतदान केल्याचा आरोप केला. त्याचवेळी टाटा समूहानंही सायरस मिस्त्री यांच्यावर विश्वासभंगाचा आरोप करून मिस्त्री यांच्यावर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – रतन टाटांचं २५ वर्षांच्या ‘दोस्ता’सोबत नवं स्टार्टअप! वाचाल तर तुम्हीही सलाम ठोकाल!

सायरसनंतर एन. चंद्रशेखरन चेअरमन

सायरस गेल्यानंतर रतन टाटा यांनी नवीन उत्तराधिकारी शोधण्यास सुरुवात केली. सायरसनंतर टीएसएसचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याकडं टाटा सन्सची कमान सोपवण्यात आली. टाटा समूहाच्या इतिहासात प्रथमच पारशी नसलेल्या आणि कुटुंबाबाहेरील व्यक्तीला टाटा समूहाचं अध्यक्ष बनवण्यात आलं. २०१९ मध्ये, नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (NCLT) ने सायरस मिस्त्री यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायाधिकरणानं चार महिन्यांची मुदत दिली होती. या चार महिन्यांत टाटा समूहानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आदेशाला स्थगिती मिळवली. एकूणच, पुन्हा एकदा सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाचं अध्यक्ष होण्यापासून रोखण्यात आलं. सायरस मितभाषी होते. मीडियात वाद होऊनही त्यांनी आपली शालीनता कायम ठेवली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment