दहावीनंतर काय? पुढचं पुढं म्हणणाऱ्या पोरांनो ‘हे’ एकदा वाचा आणि निवडा करियर ऑप्शन!

WhatsApp Group

मुंबई : आधीच्या काळात दहावी पास होतो का नाही, याचं उत्तर माहीत नसल्यामुळं पुढं काय करायचं हे सर्व नंतर ठरवलं जायचं. मुळात दहावी केली मग मोठा झालो आणि पास झालो तर शहाणा झालो, असं मिरवलं जायचं. जसजसा काळ बदलत गेला, तसतसं दहावी, बारावी, पदवीधर, पीएचडी होल्डर अशा उच्च शिक्षणाच्या पायऱ्या वाढत गेल्या. एखादा माणूस उच्च शिक्षित असला, तरी तुला दहावीला किती होते रे? असा प्रश्न हमखास विचारला जातो. भलेही तेव्हा त्या टक्क्याचं काही घेणंदेण नसायचं, पण फॉरमॅलिटी म्हणून हे वाक्य आपसूकच तोंडात येतं. आधीच्या काळात पोरं दहावीनंतर काय करायचं हे पास झाल्यानंतर ठरवतात. आता मात्र तसं नाहीये. दहावीचा रिझल्ट हाती येईपर्यंत पुढं काय करायचंय, याची ब्लू प्रिंट त्या पोराच्या आणि त्याच्या आई-वडिलांच्या डोक्यात तयार असते. गावाकडची तर आजही पुढचं पुढं बघू, आधी रिझल्ट लागू दे, असं म्हणत विषय ढकलतात.

दहावीनंतर मज्जाच असते, असं म्हणणारे आता काळाच्या ओघात नाहीसे झाले. कारण खरं काय असतं, हे समजण्याइतपत पोरं हुशार झालीत. सायन्स, आर्ट्स की कॉमर्स हे तर आपला आवाका बघूनच ठरवावं लागतं. पण तरीही आम्ही दहावीनंतर पोरांना पुढं जाण्याचे काय मार्ग असतात, याची माहिती या लेखातून देऊ. चला तर मग…वाचा दहावीनंतर आपण काय काय करू शकतो ते…

आर्ट्स ‘कलाकार’ पोरांसाठी चांगलं!

आर्ट्स घेणारा पोरगा काहीच कामाचा नसतो, ढ असतो, काहीच येत नाही म्हणून आर्ट्स घेतलंय, हे पहिलं प्रत्येकानं मनातून काढून टाकलं पाहिजे. ज्या मुलांना फक्त मजा करायची असते, पुढं काहीच करायचं नसतं, अशा पोरांचं प्रमाण जास्त असल्यामुळं आर्ट्स शाखा बदनाम झालीय. मुळात इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, मानवशास्त्र, मीडिया, फॅशन डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, एचआर, शिक्षण अशा क्षेत्रात तुमचा रस असेल, तर करियरसाठी आर्ट्स उत्तम. सीरियस पोरगा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असेल, त्याला वेळ काढून एमपीएससी, यूपीएससीसाठी तयारी करायची असेल, तरीही ही शाखा चांगली.

कॉमर्स कोणासाठी?

कॉमर्सला वाणिज्य म्हणतात, हे किती लोकांना ठाऊक आहे, हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. सायन्स झेपणारं नाही आणि आर्ट्समुळं बदनामी नको म्हणून पोरं कॉमर्स विषय निवडतात. मग पुढं साधी, समाधानी पगाराची नोकरी लागेल, एवढीच अपेक्षा बाळगतात. खरं सांगायचं तर जो पोरगा हिशोबात पक्का, ज्याला आकड्यांची आवड, डोक्यात सतत बिझनेसच्या विचाराचा असतो, त्यानं कॉमर्सच निवडावं. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए, एमबीए, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक, डिजिटल मार्केटिंग यात कॅरियर करायचं असेल, तर कॉमर्स उत्तम.

सायन्स…झेपत असेल तर घ्या!

सायन्स घेतो, असं कमी हुशार पोरानं म्हटलं, की थोडा का होईना पालकांना घाम फुटतोच. तू करशील ना, तुला जमेल ना, बघ हा विचार कर असे प्रश्न बाहेर येतात. शाळेत सीरियस अभ्यास करणारे, हुशार आणि पहिल्या बाकावर बसणारी पोरं या मार्गाला जातात. या शाखेतून इंजिनियरिंग, मेडिकल, डॉक्टर असे करियर पर्यात खुले होतात. बीटेक, एमबीबीएस, औषधक्षेत्र यात तुम्ही करियर करू शकतात. बारावीपर्यंत आपल्याला सायन्स नाही झेपलं, तर तुम्ही कॉमर्स-आर्ट्सला घुसू शकतात. सायन्स क्षेत्राचा हा मोठा फायदा आहे.

Leave a comment