मुंबई : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं २०१८ मध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या “हत्येसाठी” सर्व तयारी केल्याचा खुलासा केला आहे. यासाठी त्यानं एक खास रायफलही खरेदी केली होती, ज्यासाठी त्यानं चार लाख रुपये दिले होते. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याआधी दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी सांगितले की, लॉरेन्सनं सलमानला मारण्याचे कारणही सांगितलं. हरयाणा, राजस्थान आणि पंजाबमधील बिश्नोई समाजाला चिंकारा (भारतातील शुष्क प्रदेशात आढळणारं हरीण) प्रिय आहे. या चिंकाराच्या शिकारीमुळं बिश्नोई सलमान खानवर रागावला होता.
१९९८ मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानवर चिंकारा शिकार केल्याचा गुन्हा समोर आला होता. दोन काळवीटांची हत्या केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमानला एप्रिल २०१८ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सलमाननं वरच्या न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणात सलमानला काही काळ जोधपूर तुरुंगातही राहावं लागलं होतं. नंतर त्याला भरतपूर कारागृहात हलवण्यात आलं.
रायफल का खरेदी केली?
लॉरेन्स बिश्नोईनं पोलीस चौकशीत कबूल केलं, की त्यानं सलमान खानला मारण्यासाठी राजगढमधील रहिवासी संपत नेहराला मेसेज पाठवले होते. त्यावेळी नेहरा फरार होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्सनं सांगितलं की, सलमानला मारण्यासाठी संपत नेहराला मुंबईत पाठवलं होतं. त्यानं सलमानच्या घराभोवती रेकीही केली. पण नेहराकडं एकच पिस्तूल होतं. त्याच्याकडं लांब पल्ल्याची रायफल नव्हती. यामुळे तो सलमानवर हल्ला करू शकला नाही.
लॉरेन्सनं पोलिसांना सांगितलं की, त्यानंतरच त्यानं आरके स्प्रिंग रायफल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. लॉरेन्सच्या म्हणण्यानुसार, त्यानं दिनेश डागर नावाच्या व्यक्तीला ही रायफल खरेदी करण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी चार लाख रुपयेही भरण्यात आले. हे पैसे डागरचे भागीदार अनिल पांडे यांना देण्यात आले. मात्र, २०१८ मध्ये डागरच्या ताब्यातून ही रायफल पोलिसांनी जप्त केली होती.
लॉरेन्स बिश्नोई बराच काळ सलमान खानच्या मागं लागला आहे. गेल्या महिन्यात बिश्नोई टोळीतील तीन जणांनी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना पत्राद्वारे धमकी दिल्याचं वृत्त आलं होतं. मुसेवाला याच्याप्रमाणेच त्याला मारण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा येथे अंदाधुंद गोळीबार करून हत्या करण्यात आली होती.