Balasaheb Thackeray Oil Painting In Vidhan Bhawan : महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर खरी शिवसेना कोण यावर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू झाला आहे. या राजकीय संघर्षादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीन महिन्यांत विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे. उदय सामंत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात बसविण्यात येणार आहे. या तैलचित्राचा अनावरण सोहळा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या येत्या जयंतीदिनी म्हणजेच सोमवार, दिनांक २३ जानेवारी, २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ॲड. नार्वेकर यांनी दिली.
हेही वाचा – वर्ल्डकप जिंकल्यानंतर मेस्सीनं धोनीला पाठवलं पार्सल, झिवाला केलं खुश! पाहा काय होतं त्यात!
मुंबई विधानभवन मध्यवर्ती सभागृहात २३ जाने.रोजी हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची घोषणा.
पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तैलचित्र बसविण्याची केली होती मागणी— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 27, 2022
माहे ऑगस्ट, २०२२ पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे तैलचित्र बसविण्याबाबत निवेदन केले होते. त्यानुषंगाने याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येईल असे या सभागृहाला आश्वासित केले होते. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे समारंभपूर्वक झळकणार आहे. या संस्मरणीय सोहळ्यास उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांनी यावेळी सर्व सदस्यांना केली.