

Balasaheb Thackeray Maharashtra Bhavan In Ayodhya : प्रभू श्री रामचंद्र यांचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभू श्री रामच्रंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या निणर्यांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी येथील माध्यमांना दिली. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी त्यांना भरपाई मिळावी, यासाठी स्वत: पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Bank FD : जर 1 लाखाची एफडी वेळेआधी मोडली तर बँक किती पैसे देईल? वाचा नियम!
अयोध्येतील वातावरण भक्तीभावाने भारावलेले असून श्री राम मंदिराच्या गर्भगृहातील वातावरण दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे आहे. जानेवारी २०२४ मध्ये मंदिराचे बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. तसेच हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर ज्येष्ठ संत महंतांची भेट घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी मंदिर बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!