मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं एक मोठी पोस्ट शेअर करून बॉलिवूड आणि चित्रपट क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. इंस्टाग्रामवर तनुश्रीनं एक लांबलचक पोस्ट लिहून तिनं पुन्हा आपली व्यथा मांडली. ‘आशिक बनाया आपने’ फेम अभिनेत्रीनं आज पहाटे एक पोस्ट शेअर केली आणि नाना पाटेकर आणि बॉलीवूड माफियावर तिचा छळ केल्याचा आरोप केला. यासोबतच तिनं इंडस्ट्रीतील काही लोक आणि पत्रकारांवर फेक न्यूज चालवल्याचा आरोपही केला आहे. तनुश्रीनं पुन्हा सांगितलं की, अनेक लोक तिला टार्गेट करत आहेत आणि तिचा छळ केला जात आहे.
काय म्हणाली तनुश्री?
तनुश्री दत्तानं या पोस्टमध्ये आपली व्यथा मांडली. तनुश्रीनं तिच्या फोटोसह इंस्टाग्रामवर लिहिले, ”मला कधी काही झालं तर #metoo आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील, त्यांचे सहकारी आणि त्यांचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार आहेत! कोण आहे बॉलीवूड माफिया?? एसएसआर मृत्यू प्रकरणात ज्यांची नावं पुन्हा पुन्हा आली तीच लोकं.’ (लक्षात घ्या की प्रत्येकाचा फौजदारी वकील एकच असतो)”
हेही वाचा – MiG-21 विमानाचा भारतीय इतिहास वाचलाय का? ६२ वर्षात झाले आहेत २०० अपघात!
तनुश्रीनं पुढं लिहिलं, ”त्याचे चित्रपट पाहू नका, त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाका.” तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये तिच्या आणि तिच्या पीआर लोकांबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पत्रकारांचा उल्लेख केला आहे. त्यांच्यासोबत आपणही या मोहिमेत व्यस्त असल्याचं तिनं सांगितलं. तिनं शेवटी लिहिलं, ”प्रत्येकाने यांच्या पाठी लागा! त्यांचं जीवन नरक बनवा कारण त्यानं मला खूप त्रास दिला. कायदा आणि न्याय मला अपयशी ठरले असतील पण माझा या महान देशाच्या लोकांवर विश्वास आहे. जय हिंद…आणि बाय! पुन्हा भेटू…”
तनुश्रीचा नाना पाटेकरांवर MeToo चा आरोप..
तनुश्री दत्ता २०१८ मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली होती, जेव्हा तिनं अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर MeToo चा आरोप केला होता. नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, २००९ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. तनुश्री दत्ता शेवटची २०१० मध्ये ‘अपार्टमेंट’ चित्रपटामध्ये रुपेरी पडद्यावर दिसली होती.
हेही वाचा – BGMI खेळणाऱ्यांसाठी धक्का..! PUBG नंतर हा गेमही भारतात बॅन? काय झालंय वाचा!
“मी नक्कीच आत्महत्या करणार नाही, कान उघडा आणि ऐका. मी सोडत नाही आणि कुठेही जात नाही. मी इथे राहण्यासाठी आणि माझ्या सार्वजनिक कारकीर्दीला पूर्वीपेक्षा अधिक उंचीवर नेण्यासाठी आली आहे”, असं तनुश्रीनं याआधी म्हटलं होतं.