Andheri East Bypoll Election : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारी दिली. यात भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. आज दुपारी भाजपने आपल्या उमेदवाराचे नाव मागे घेतले. यानंतर ऋतुजा बिनविरोध विजयी होतील, असे मानले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. आता ठाकरेंनी एक पत्र लिहून आभार मानले आहेत.
राज ठाकरे म्हणाले, ”प्रिय मित्र देवेंद्र, जय महाराष्ट्र…, काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात, ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार.”
हेही वाचा – T20 World Cup 2022 : थोडक्यात बचावला सूर्यकुमार यादव..! जीवघेण्या बाऊन्सरनं हेल्मेट तुटलं; पाहा Video
अंधेरी (पूर्व) पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल @Dev_Fadnavis आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी हीच आमची धारणा ! pic.twitter.com/VKmmJl3Gno
— Raj Thackeray (@RajThackeray) October 17, 2022
अंधेरी पूर्व विधानसभेसाठीची लढत खूपच रंजक असणार होती. ही निवडणूक गुजराती विरुद्ध मराठी अशी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. कारण या जागेवर हिंदी आणि मराठी भाषिक मतदारांचे वर्चस्व आहे. काही मोजक्याच भागात गुजराती लोकसंख्या आहे. रमेश लटके यांनाही मराठी मतदार एकदिलाने मतदान करत होते. २०१४ च्या मोदी लाटेतही ते या जागेवरून विजयी झाले होते. एवढेच नाही तर या निवडणुकीत उद्धव यांच्या उमेदवाराच्या बाजूने सहानुभूतीच्या मतांची लाट येण्याची दाट शक्यता होती.