

Andheri East By Elections 2022 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या १६६-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर २०२२ पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत हदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे ही जागा रिक्त होती. एखाद्या आमदाराचा मृत्यू झाल्यास सहा महिन्यांच्या आत संबंधित मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे गरजेचे असते.
निवडणुकीचा कार्यक्रम –
- निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – ७ ऑक्टोबर २०२२ (शुक्रवार)
- नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – १५ ऑक्टोबर २०२२ (शनिवार)
- नामनिर्देशन पत्रांची छाननी – १५ ऑक्टोबर २०२२ (शनिवार)
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक – १७ ऑक्टोबर २०२२ (सोमवार)
- मतदानाचा दिनांक – ३ नोव्हेंबर २०२२ (गुरुवार)
- मतमोजणीचा दिनांक – ६ नोव्हेंबर २०२२ (रविवार)
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – ८ नोव्हेंबर २०२२ (मंगळवार)
या पोटनिवडणुकीसाठी दि. १ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदारांची ओळख पटावी यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार कार्ड वापरता येईल. तथापि, ज्या मतदारांकडे मतदार कार्ड नसेल त्यास आयोगाने निश्चित केलेल्या ९ ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदानावेळी जवळ बाळगणे आवश्यक आहे.
हेही वाचा – मजा, मस्ती अंगउलट आली..? शिमरॉन हेटमायर टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर; घोडचूक नडली!
या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहे, त्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची निवड का केली याबाबतची माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे. या पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके तर भाजपाकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत. या निवडणूकीत भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.