मुंबई : महिंद्रा उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा आणि हापूस आंबा यांचा एक मोठा संबंध आहे. तुमच्या मनात ही पहिली ओळ वाचून प्रश्नचिन्ह नक्कीच तयार होईल, पण हा संबंध कसा याचा खुलासा या लेखातून होईल. अप्रतिम गोडी, नैसर्गिक चव आणि हंगामी उत्पादनामुळं हापूस आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. या राजाचं उत्पादन घेणारा शेतकरी बागायतदार म्हणून ओळखला जातो. तसा हा शब्द पैशानं आणि वजनानंही मोठा असतो. कारण हापूसचं उत्पन्न घेणारा व्यक्तीही बऱ्यापैकी धनवान असतो.
मनुष्यबळ, चांगली आणि दर्जेदार औषध, खतं, मुबलक पाणी या गोष्टी हापूस आंब्याचं उत्त्पन्न घेण्यासाठी आवश्यक असतात. यासोबतच तयार आंबा काढण्यासाठी कुशल माणसं, आंबातोडीची साधनंही गरजेची असतात. आधीच्या काळात माणसं खांद्या-डोक्यावरून आंब्याची, पाण्याची ओझी वाहायची. फार कमी लोकांकडं वाहनं असायची. आधी आयशेर, अशोक लेलॅंड अशा मोठमोठाल्या गाड्या असायच्या. आंबा उत्पादन कमी आणि ट्रकचं आकारमान मोठं असायचं. त्यामुळं प्रत्येकाला ही अवजड वाहनं पोसणं शक्य व्हायचं नाही. आता मात्र काळ बदललाय. त्याच एन्ट्री झाली महिंद्राच्या पिकअप गाडीची.
बदलत्या आणि नफायुक्त उत्पादनपद्धतीनुसार आंबा बागायतदार पिकअप गाडी खरेदी करू लागला. फायद्याचं प्रमाणं जास्त असल्यामुळं एकानं घेतली, की दुसराही घेतो, हे सर्वत्र दिसून आलं. आता तर आंबा बागायतदार म्हटलं की त्याच्याकडं पिकअप गाडी असणारच, असा समज सर्वत्र झाला आहे.
पिकअप गाडी आंब्याच्या हंगामात मोलाचं काम करते. साधारणे १० लाख किमतीची ही गाडी खरेदी करण्यासाठी बागायतदार शक्यतो हप्ता पद्धतीनुसार आपल्या ताफ्यात सामील करतो. पावसाळी ऋुतूमध्ये कलमांना शेणखत, शिटवा, गांडुळखत टाकण्यासाठी पिकअपचा वापर होतो. कामगारांची ने-आण करण्यासाठी, घरात कार्यक्रम असतील तर त्यांचं सामान आणण्यासाठी पिकअपशिवाय दुसरा पर्याय नाही. जर स्वत: गाडी खरेदी करता येत नसेल, तर भाड्यासाठी पिकअपसारख्या गाडीचाच पर्याय आहे.
पावसाळ्यानंतर फवारणीच्या वेळी पिकअप गाडीत पाण्याची मोठी टाकी ठेवली जाते आणि ही गाडी संपूर्ण बागेत फिरवून झाडांना पाणी दिलं जातं. खडकाळ जमिन ज्याला कोकणात कातळ म्हटलं जातं, तिथेही ही गाडी आपल्या दणकट अंदाजामुळं कामी येते. छोटे भूधारक शेतकऱ्यांचा कलही आता पिकअपसारख्या गाड्यांकडं वळला आहे. ज्या काळात आंबा धरायला लागतो म्हणजे पैसा कमावण्याच्या काळात ही गाडी पेट्यांची ने-आण करण्यासाठी वापरली जाते. देवगड-रत्नागिरीमधून आंबा कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) पाठवण्यासाठी पिकअप गाडी १५० ते २०० पेट्यांची वाहतूक करते. पेट्रोल डिझेल खर्च भागवून एका खेपेस गाडीमालकाला १०,००० रुपयांचा नफा होतो. अशा जवळपास १० ते १५ खेपा वाशी मार्केटला ऐन हंगामात मारल्या जातात. त्यामुळं सर्वगुणसंपन्न पिकअप गाडीसोबत मेहनतीची स्टेपनी असेल, तर धंद्याचा प्रवासही यशस्वी होतो.