“मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही…”, राज्यपालांच्या बांधकाम व्यावसायिकांना सूचना!

WhatsApp Group

Governor Bhagat Singh Koshyari : गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी २-३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आपला नफा कमीत कमी ठेवावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या ‘३० व्या प्रॉपर्टी एक्स्पो’ या फ्लॅट्स व गृहविक्री प्रदर्शनाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी रविवारी (दि. १६) भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. गृहविक्री प्रदर्शनाचे आयोजन क्रेडाई – महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीने केले होते. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी आयोजित केलेल्या भव्य गृह विक्री प्रदर्शनामुळे घर खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक विनाविलंब घर घेण्यास उद्युक्त होतील, असे राज्यपालांनी सांगितले.

हेही वाचा – Andheri East Bypoll Election : “…हीच आमची धारणा”, राज ठाकरेंचं भाजपसाठी अजून एक पत्र!

गृहनिर्माण बांधकाम व्यवसायामुळे किमान २५० छोट्या मोठ्या उद्योगांना चालना मिळते, अनेक लोकांना रोजगार मिळतो तसेच, शासनालादेखील महसुली उत्पन्न मिळते. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्र अनेक उद्योगांचा कणा असल्याचे क्रेडाई – एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनातील विविध बांधकाम व्यावसायिकांच्या दालनाला भेट दिली. राज्यात फ्लॅट – घराची नोंदणीसाठी ई-नोंदणीची सुविधा सुरु केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते यावेळी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रेडाई -एमसीएचआय संस्थेचे पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

Leave a comment