अग्निपथ भरती योजना : स्कीम भारी असली तरी भारत सरकारनं ‘मास्टरस्ट्रोक’च खेळलाय!

WhatsApp Group

मुंबई : आर्मीत भरती होण्याचं स्वप्न पाहत असाल, तर आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक खुशखबर दिलीय. तसं आपल्याकडं नवनवीन योजना जाहीर होतात, पण ही योजना ऐकून देशप्रेमी युवकांना लयच भारी वाटेल. लष्करातील भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी ‘अग्निपथ भरती योजना’ जाहीर केलीय. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती केलं जाईल. यासोबतच त्यांना नोकरी सोडताना सर्व्हिस फंड पॅकेज मिळेल. शिवाय, योजनेंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निवीर म्हटलं जाणार आहे.

देशसेवेची भावना असलेल्या तरुणांना सैन्यात अल्प आणि दीर्घकालीन नोकरीची संधी मिळेल. तिन्ही दलांमध्ये तरुणांचा सहभाग वाढवला जाईल. तिन्ही दलांच्या प्रमुखांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या योजनेचं सादरीकरणही केले होतं.

कोणाला संधी आणि कधी होणार भरती?

ज्याचं वय १७.५ ते २१ वर्षे असेल, अशा तरुणांना संधी मिळेल. या तरुणांचं प्रशिक्षण १० आठवडे ते ६ महिन्यांचं असेल. १०वी-१२वीचे विद्यार्थी अर्ज करु शकतील. अग्निवीरांची पहिली भरती ९० दिवसांची असेल. देशसेवेदरम्यान कोणत्याही अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सेवा निधीसह व्याजासह एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळणार आहे. याशिवाय उर्वरित सेवेचा पगारही दिला जाणार आहे. त्याच वेळी, जर कोणी अग्निवीर अपंग झाला तर त्याला ४४ लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाईल. याशिवाय उर्वरित नोकरीचा पगारही मिळणार आहे. ही भरती गुणवत्ता पाहून करण्यात येणार आहे.

कितीचं पॅकेज असेल?

संरक्षण मंत्रालयानं सांगितल्यानुसार, अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना पहिल्या वर्षासाठी ४.७६ लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळेल. चौथ्या वर्षापर्यंत हे पॅकेज ६.९२ लाखांपर्यंत वाढेल. याशिवाय इतर भत्तेही मिळतील. चार वर्षांच्या सेवेनंतर युवकांना ११.७ लाख रुपयांचा सेवा निधी दिला जाईल. या निधीवर कोणताही कर आकारला जाणार नाही.

सरकारचा मास्टरस्ट्रोक!

चार वर्षांनंतर बहुतांश जवानांना त्यांच्या सेवेतून सोडण्यात येईल. पण कुशल आणि सक्षम असणारे २५ टक्के तरुण सैन्यात राहू शकतील. मात्र, त्या वेळी सैन्यात भरती झाली तरच हे शक्य होईल. या योजनेमुळं लष्कराचीही कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते. एकीकडं कमी लोकांना पेन्शन द्यावी लागेल, तर दुसरीकडे पगारातही बचत होणार आहे. या सेवेनंतर तरुणांना इतर कुठे नोकरी करायची असेल, तर त्यांचं प्रोफाइल मजबूत होईल आणि प्रत्येक कंपनी अशा तरुणांना कामावर घेण्यास स्वारस्य दाखवेल.

Leave a comment