अभिनेता KRK उर्फ कमाल खानला अटक; मुंबई पोलिसांनी विमानतळावरून घेतलं ताब्यात!

WhatsApp Group

Kamal Rashid Khan Arrested : अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान (KRK) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केआरकेला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. वादात सापडलेल्या केआरकेविरोधात मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. केआरके त्याच्या कोणत्याही ट्वीटमुळं अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळं तो अनेकदा चर्चेत असतो. तो बॉलिवूडमधील सर्व बड्या स्टार्सना बिनधास्तपणे टार्गेट करत असतो. आपल्या ट्वीटमध्ये त्याने सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत बॉलीवूडच्या सुपरस्टार्सबद्दल वाईट वक्तव्य केलं आहे.

केआरकेला का अटक करण्यात आली?

केआरके त्याच्या एका ट्वीटमुळं अडचणीत सापडला आहे. एका वादग्रस्त ट्विटमुळं केआरकेवर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मालाड पोलिसांनी कमाल आर खान याला विमानतळावरून ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अटक केली. २०२० मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यावरून केआरकेला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. केआरकेवर सोशल मीडियावर धर्माबाबत वादग्रस्त ट्वीट केल्याचा आरोप आहे. केआरकेविरोधात युवासेना सदस्य राहुल कानल यांनी तक्रार केली होती. त्याला आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा – जग सोडून गेल्यानंतरही ‘तुफान’ पैसे कमावणारा माणूस म्हणजे मायकल जॅक्सन!

माहितीनुसार, एफआयआर नोंदवल्यानंतर २०२० मध्ये केआरके विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्यावर केआरकेनं अपमानास्पद ट्वीट केल्याचाही आरोप आहे. केआरके याला मालाड पोलिसांनी आयपीसी 153A, 294, 500, 501,505, 67/98 कायद्यान्वये अटक केली आहे. कमाल आर खानला आज सकाळी ११ वाजता बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

राहुल कनाल म्हणाले, ”माझ्या तक्रारीवरून आज कमाल आर खानला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईचे मी स्वागत करतो. तो सोशल मीडियावर अपमानास्पद कमेंट करतो आणि अपशब्द वापरतो. अशी वागणूक समाजात स्वीकारता येत नाही. त्याला अटक करून मुंबई पोलिसांनी अशा लोकांना कडक संदेश दिला आहे.”

याआधीची प्रकरणं..

केआरके यापूर्वी त्याच्या ट्वीटमुळं मानहानीच्या कायदेशीर लढाईत अडकला होता. बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खाननं त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. केआरकेनं सलमानच्या राधे चित्रपटाचा नकारात्मक रिव्ह्यू केला आणि त्यानं सलमानवर वैयक्तिक टिपण्णीही केली. याच कारणामुळे सलमाननं केआरकेवर कायदेशीर कारवाई केली. सलमानशिवाय अभिनेता मनोज बाजपेयी यानंही अपमानास्पद ट्वीट केल्यामुळं केआरकेवर कारवाई केली आहे. केआरकेनं हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो चित्रपटांची निर्मितीही करतो. केआरकेनं २००५ साली ‘सितम’ चित्रपटातून निर्माता म्हणून करिअरला सुरुवात केली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment