मुंबई : सर्वात स्वस्त आणि मस्त प्रवास म्हणजे आपल्या रेल्वेचा प्रवास. विमानप्रवास आणि वैयक्तिक गाडीचा प्रवास वेळवाचवू आणि स्वमर्जीचा असला, तरी रेल्वे प्रवास आनंददायी असतो. रिझर्वेशन असेल आणि स्लीपर कोच असेल, तर त्या प्रवासाची बातच न्यारी असते. लांबच्या प्रवासात रेल्वे प्रत्येक स्टेशनवर थांबली की आपलीही चुळबूळ सुरू होते. खाण्यापिण्याची लगबगीसाठी किंवा आळस झटकण्यासाठी आपल स्टेशनवर दोन मिनिटं का होईना, पण उतरतोच. सगळ्याच स्टेशनमध्ये एक गोष्ट सारखी असते, ती म्हणजे स्टेशनचे नाव असलेले पिवळे बोर्ड. स्टेशनच्या दोन्ही तोंडांकडं हे बोर्ड उभे असतात. पण हे बोर्ड नेहमी पिवळ्या रंगाचेच का असतात? इतर रंगांमध्ये ते लिहिले जाऊ शकत नाहीत का?
हा रंग असतो तेजस्वी…
देशातील सर्व रेल्वे स्टेशनचे बोर्ड पिवळे आहेत. पिवळा रंग मुक्काम सूचित करतो. स्टेशनवरील पिवळा बोर्ड थांबण्याचे संकेत देतो. पिवळा रंग रेल्वेचा वेग कमी आणि नियंत्रित करण्यासाठी देखील सूचित करतो. ज्या गाड्या स्टेशनवर थांबायच्या आहेत, त्या गाड्यांना दुरूनच पिवळा बोर्ड दिसतो. सूर्याचा रंग पिवळा असतो, त्याचा प्रकाशही तेजस्वी असतो. म्हणून हा रंग वापरला जातो.
गर्दीच्या भागात, पिवळी पार्श्वभूमी चांगली दिसते. इतकंच नाही तर अंधार असतानाही इतर रंगांऐवजी पिवळा बोर्ड सहज दिसतो. पिवळ्या पार्श्वभूमीवर काळं लिखाण सर्वात प्रभावी आहे. त्यामुळे प्रवाशांना दुरूनच स्थानकाचं नाव दिसतं आणि त्या स्थानकावर उतरावं की नाही हे प्रवाशांना आधीच कळतं. त्याचप्रमाणे धोक्यासाठी लाल रंगाच्या पार्श्वभूमीचा बोर्ड वापरला जातो. लाल रंग अतिशय उठून दिसतो, ज्यामुळे धोका दुरूनच जाणवतो.
मानसशास्त्रीय कारणं…
भारतीय रेल्वे स्टेशनचे बोर्ड पिवळे का असतात याची अनेक मानसिक कारणंही आहेत. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की पिवळा रंग लोकांना त्यांच्याकडं आकर्षित करतो. मानसशास्त्रानुसार, पिवळा हा रंग आहे जो आनंद देतो आणि दररोज नवीन प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतात. अशा परिस्थितीत स्टेशनचं नाव त्यांना दिलासा देऊ शकतं.
रेल्वे स्टेशनवरील पिवळा बोर्ड रेल्वे चालकाला सतर्क करण्याचं काम करतो. अनेक गाड्या नॉनस्टॉप असतात आणि त्या प्रत्येक स्टेशनवर थांबत नाहीत. पण तिथला पिवळा बोर्ड त्यांना सतर्क राहण्यासाठी तयार ठेवतो. पिवळा रंग पुढं स्टेशन आहे, की नाही याबाबत ड्रायव्हरला सूचना देतो. त्यामुळे अपघात होण्याचं प्रमाण कमी होतं.