मुंबई : अचानक तुम्हाला नोटा छापण्याचं मशीन सापडल्यास तुम्ही काय कराल? कुणीही प्रश्नाचं उत्तर द्यायला क्षणभरही वेळ घेणार नाही. आम्ही हव्या तेवढ्या नोटा छापू आणि काय, असं उत्तर ऐकायला येईल. पण हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. ज्यांच्याकडं नोटा छापण्याचं यंत्र आहे, तेही त्यातून नोटा छापू शकत नाहीत. कारण नोटा छापण्यासाठी परवानगीची गरज आहे. आता नोटा कशा छापल्या जातात? नोटा छापण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे? आणि नोट छापण्यासाठी किती खर्च येतो? याबाबतची सगळी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे?
भारतीय चलनी नोटा छापण्याचा अधिकार भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्याकडं आहे. एक रुपयाची नोट वगळता सर्व नोटा रिझर्व्ह बँक छापते. एक रुपयाची नोट अर्थ मंत्रालय जारी करते. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या नोटा छापण्याचा अधिकार आरबीआयला आहे.
नोटा छापण्याचा निर्णय कसा घेतला जातो?
नोटा छापण्याचा निर्णय फक्त आरबीआय घेऊ शकत नाही. त्यासाठी त्याला सरकारची परवानगी घ्यावी लागते. हा निर्णय घेण्यासाठी सरकार आरबीआयशी सल्लामसलत करते. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जातो. हा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारत सरकार अनेक नियम लक्षात घेऊनच घेऊ शकते.
नोटा छापण्यासाठी आरबीआयला किमान राखीव प्रणाली (Minimum Reserve System) नावाच्या नियमाचं पालन करावं लागतं. हा नियम सन १९६५ मध्ये करण्यात आला होता. या नियमानुसार विदेशी पैसे किंवा ११५ कोटी रुपयांचे सोनं ठेवल्यानंतरच गरजेनुसार नोटा छापता येतात.
नोटा कुठं छापल्या जातात?
नोटा फक्त सरकारी छापखान्यात छापल्या जातात. देशात नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी या ठिकाणच्या चार सरकारी छापकारखान्यात नोटा छापण्याचं काम केलं जातं. सर्व चलनी नोटांवर सही आरबीआयच्या गव्हर्नरची असते. सर्व नोटा वचनचिठ्ठीच्या स्वरूपात असतात. आरबीआय सर्वाधिक म्हणजे १०,००० रुपयांपर्यंत किंमतीची नोट छापू शकते. सध्या चलनी नोटांमध्ये १०रु, २०रु, ५०रु, १००रु, २०० रु, ५०० रु, २००० रुपये वापरले जातात.
१९५५ मध्ये “नाणे दुरुस्ती कायदा” मान्य करण्यात आला आणि या कायद्यानुसार १ एप्रिल १९५७ रोजी “दशमान चलन पद्धती” अस्तित्वात आली. त्यानुसार एक रुपया समान १०० पैशांमध्ये विभागित करण्यात आला.
फाटलेल्या नोटांचं काय करतात?
खराब आणि जुन्या नोटा आरबीआय आपल्याकडं घेतं आणि त्या चलनात आणल्या जात नाहीत. आधी या नोटा जाळल्या जात होत्या, पण आका एका मशीनद्वारे या नोटांचे तुकडे करू विटा बनवल्या जातात, या विटा अनेक कामात वापरल्या जातात.