मुंबई : शीर्षक वाचून तुम्हाला नवल वाटलं असेल ना. पण हे खरं आहे. महाराष्ट्रात एक अशी भाकरी बनवली जाते, जी एक-दोन नाही तब्बल पाच महिने टिकते. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं ही भाकरी बनवली जाते. त्यामुळेच तिला ‘सोलापूरची कडक भाकरी’ म्हणतात. ज्वारी आणि बाजरी या दोन्ही धान्यांपासून भाकऱ्या बनवल्या जातात. चादर आणि टॉवेल म्हटलं की ती सोलापुरीच! तसंच भाकरी नि शेंगाचटणी म्हटलं की ती सोलापुरचीच, असंच बोललं जातं. सोलापुरी शेंगाचटणी आणि ज्वारी, बाजरीच्या कडक भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक देशीविदेशी पाहुणे नेहमीच आसुसलेले असतात. खवय्यांचा रवय्या पुरविण्यासाठी लसणाची खमंग शेंगाचटणी. उपवासालाही चालणारी चटणीही मिळते. अशा बिनलसणाच्या दाणेदार, लज्जतदार, चटकदार शेंगाचटणीचे बखाणे भरण्यासाठी सोलापूरला येण्याचे बहाणेच पुरे. चटकदार खाणार त्याला सोलापूर देणार, हा बाज येथील खाद्यविश्वातील उद्योजक खवय्यांच्या थेट रक्तातच भिनवतात. शेंगाचटणी, ज्वारी-बाजरी-नाचणीची कडक भाकर, जोडीला कच्चा कांदा आणि थोडीशी जीभ भाजवायला अस्सल हिरव्या मिरचीचा फोडणीचा झणझणीत ठेचा, असा फक्कडसा बेत सोलापुरात येऊन नक्की करायला हवा.
एक भाकर किती रुपयाला?
सोलापूर शहर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असल्यामुळं सोलापुरात कन्नड भाषिक लोकांचे प्रमाण जास्त आहे. कडक भाकरी ही कन्नड भाषिक लोकांचे पारंपारिक खाद्य. त्यामुळं सोलापुरात कडक भाकरीला जास्त महत्व आहे. प्लॅस्टिक पिशवीमध्ये कडक भाकरीचे पॅकिंग केलं जातं. एका पॅकेटमध्ये पाच भाकरी असतात. सुरुवातीला प्रति पाकीट २५ रुपये याप्रमाणे विक्री होत होती. मात्र, आता वाढत्या महागाईमुळं प्रति पाकिटाची किंमत ४० रुपये झाली आहे. किरकोळ विक्रीत एक भाकरी १० रुपयांना विकली जाते. भाकरीची खरेदी संख्या जास्त असल्यास ९ रुपये दर ठेवला आहे. ज्वारी, त्याचे पीठ, महिलांचा रोजगार, पॅकिंग असा सगळा खर्च वजा जाता दिवसाकाठी भाकरी विक्रेत्यांना ४०० ते ५०० रुपये मिळतात. या भाकरीमुळे सोलापुरातील अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. हजारो महिला या भाकरीच्या जीवावर आपला संसार चालवतात. महिला बचत गटाच्या माध्यमातून या कडक भाकरीचे आता ऑनलाईन मार्केटिंगही सुरु करण्यात आले आहे.
कशी बनते कडक भाकरी ?
हातानं थापलेली मऊसूत भाकरी गरम तव्यावर ठेवून भाजली जाते. भाकरी भाजली की ती विस्तवासमोर ठेवली जाते. त्यानंतर ती मोकळ्या हवेत किंवा पंख्याखाली वाळवली जाते. जेव्हा भाकरीतील ओलावा संपतो तेव्हा ती कडक बनते. पातळ थापल्यामुळे भाकरी पापडासारखी कुरकुरीत लागते. सोलापूरच्या या भाकरीला केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रचंड मागणी आहे. सातासमुद्रापार विदेशी लोकांनाही या भाकरीनं वेड लावलं आहे.