Home Remedy Tips For Eye Care : टीव्ही आणि लॅपटॉप-मोबाईल यांच्या अतिवापरामुळं डोळ्यांना खूप नुकसान होतं. याचं कारण असं की यांच्यापासून जे ब्लू रेज येतात, ते त्वचा आणि डोळे या दोघांसाठी हानिकारक असतात. यामुळं डोळे थकल्यासारखे दिसू लागतात आणि त्वचेवर मुरुम, अकाली सुरकुत्या अशा सर्व प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता.
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
१) टी बॅग (चहाच्या पिशव्या) कामी येतील..
डोळ्यांना आराम देण्यासाठी एक ग्लास उकळलेल्या पाण्यात दोन टी बॅग २ ते ४ मिनिटे ठेवा. नंतर त्या टी बॅग काढून टाका, आणि टीबॅगमधील अतिरिक्त पाणी काढून टाका. टी बॅग खोलीच्या तापमानावर हळूहळू थंड होऊ द्या किंवा रेफ्रिजरेटरमध्ये १० मिनिटे थंड करा. १५ मिनिटे बंद डोळ्यांवर या बॅग ठेवा. त्यानंतर काही वेळ विश्रांती घ्या.
२) डोळे पाण्यानं स्वच्छ धुवा..
दिवसभरात किमान ५ ते ६ वेळा थंड पाण्यानं डोळे धुण्याचा प्रयत्न करा. रात्री झोपण्यापूर्वी, एक कापसाचा गोळा घ्या आणि नंतर थंड पाण्यात भिजवा. नंतर ओल्या कापूसमधील अतिरिक्त पाणी काढून काही वेळ डोळ्यांवर ठेवून विश्रांती घ्या.
३) काकडी थंडावा देईल…
थकलेल्या डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी तुम्ही काकडीचाही वापर करू शकता. यासाठी एक काकडीचे दोन गोल काप करून घ्या. आधी थंड पाण्यानं डोळे धुवा आणि नंतर काकडीचे गोल काप डोळ्यांवर काही वेळ ठेवा.
४) गुलाबपाण्याचा वापर…
दिवसभर लॅपटॉपवर काम केल्यानंतर डोळ्यात जळजळ किंवा खाज येऊ शकते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. यासाठी कापसाचा गोळा घ्या आणि त्यावर गुलाबपाणी टाकून काही वेळ डोळ्यांवर ठेवा.
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा!
१) हायड्रेटेड राहा…
डोळ्यांसोबतच शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरिराला पुरेशा प्रमाणात पाण्याची आवश्यक आहे. जर तुम्ही पुरेसे हायड्रेटेड असाल, तर तुमचे डोळे कोरडे पडणे किंवा खाज सुटण्यापासून रोखू शकता.
२) हात वारंवार धुवा…
बॅक्टेरियाला दूर ठेवण्यासाठी आणि आपले डोळे, चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी आपले हात वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावे .
३) आहाराची काळजी घ्यावी..
डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात सर्व प्रकारची जीवनसत्त्वं (vitamins )आणि खनिजांचा (minerals) समावेश करावा. तुम्ही जो आहार घेताय तो पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याची खात्री करा.
४) झोपेची काळजी घ्या
तुमच्या शरीराच्या इतर अवयवांसारखेच तुमच्या डोळ्यांनाही आरामाची आवश्यकता असते त्यामुळे पुरेशी झोप होईल याची काळजी घ्यावी.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!