VIDEO : “जनावरंही खाऊ शकत नाही, असं अन्न आम्हाला मिळतंय”, पोलीस कॉन्स्टेबल सर्वांसमोर रडला!

WhatsApp Group

UP Police constable video : उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाविरोधात एका पोलीस कॉन्स्टेबलची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये कॉन्स्टेबल मनोज कुमार म्हणतात, “जे अन्न दिलं जात आहे ते असं आहे की जनावरं देखील खाऊ शकत नाही, परंतु आम्हाला खायला दिलं जातं. वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि डीसीपी यांनी केलेला हा घोटाळा आहे. या लोकांमार्फत पोलिसांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं.”

सीएम योगींनी आश्वासन देऊनही काहीही झालं नाही..

आम्हाला पौष्टिक आहार मिळावा यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ केली जाईल, असं आश्वासन दिलेलं असतानाही निकृष्ट दर्जाचं अन्न दिले जात असल्याचंही मनोज कुमार म्हणाले. मात्र, कुमार अन्नाच्या दर्जाबाबत अनावश्यक गोंधळ घालत आहे, असं पोलीस मेस व्यवस्थापकानं सांगितलं.

काय म्हणाले मनोज कुमार?

मनोज कुमार म्हणाले, ”रिझर्व्ह इन्स्पेक्टर म्हणतात की मला लवकरच निलंबित केलं जाईल. मी डीजीपी सरांना अनेकवेळा समस्या सांगितल्या, पण आजपर्यंत तोडगा निघाला नाही. अधिकारी ऐकायला तयार नसतील तर तक्रार कुणाकडं करायची ते तुम्हीच सांगा, सैनिक रोज आत्महत्या करतात, ऐकणारं कोणी नाही. आमच्या आयुष्याला काहीच महत्त्व नाही. कुणाला सांगू, माझे आई-वडील थोडे इथे आहेत. मेस मॅनेजरकडून धमकी आली आहे की तू लोकांना हे दाखवलंस तर तुला नोकरीवरून काढून टाकू. तुम्हीच सांगा माझ्यावर अत्याचार झालाय की नाही? डीजीपी साहेबांनी फोन केला असता त्यांच्या पीएसओने सांगितले की फोन कट करा नाहीतर कामावरून काढून घरी पाठवलं जाईल. एडीजींना फोन केला पण त्यांनी उचलला नाही.”

हेही  वाचा – हवालदारासाठी ७००, सब इन्स्पेक्टरसाठी १८७० रुपये…; ‘इथं’ पोलीस भाड्यानं मिळतात!

याआधीही मनोज यांनी मेसमधील अन्नाचा व्हिडिओ बनवला होता. कच्च्या रोट्या खाल्ल्यानं पोलीस नाराज झाले आहेत. याबाबत तक्रार केली, मात्र कारवाई झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) आशिष तिवारी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एसएसपी म्हणाले, की कॉन्स्टेबल मनोज कुमार यांनी जेवणाच्या गुणवत्तेसाठी जे केलं आहे, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

कॉन्स्टेबलवर १५ तक्रारी दाखल

एसएसपी म्हणाले, की अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी कार्यक्षेत्र (शहर) अभिषेक श्रीवास्तव यांच्याकडे प्रकरण सोपवण्यात आलं आहे. या कॉन्स्टेबलविरुद्ध पोलीस लाईनमध्ये यापूर्वीच १५ तक्रारी दाखल आहेत, ज्यात अनुशासनहीनता, कर्तव्यावर अनुपस्थिती आणि इतर प्रकरणांचा समावेश आहे. मंडळ अधिकारी हिरा लाल कनोजिया यांना प्रकरणांची चौकशी करण्यास सांगितलं आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment