बातमीच आहे ‘भारी’..! भारतीय शास्त्रज्ञांनी खाऱ्या पाण्यावर चालणारा LED कंदील तयार केलाय!

WhatsApp Group

India’s First Saline Water LED Lantern : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या खाऱ्या पाण्याच्या कंदीलाचं अनावरण केलं आहे. या कंदिलाला ‘रोशनी’ असं नाव देण्यात आलं आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे या कंदिलातील एलईडी दिवा लावण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर केला जातो, जे विशेष डिझाइन केलेल्या इलेक्ट्रोड्समध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतं. भारताच्या डीप ओशन मिशनचं कामकाज पाहण्यासाठी डॉ. जितेंद्र सिंह यांनी ‘सागर अन्वेशिका’ या सागरी संशोधन जहाजाला भेट दिली. हे जहाज राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (National Institute of Ocean Technology-NIOT), चेन्नई द्वारे संचालित केलं जातं.

मच्छिमारांचं जीवन होणार सुकर!

डॉ. जितेंद्र सिंह म्हणतात, की खाऱ्या पाण्याचा कंदील गरीब आणि गरजूंसाठी खूप प्रभावी सिद्ध होईल. विशेषत: भारताच्या ७५००० किमी लांबीच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छिमारांचं जीवन या कंदीलामुळं सुकर होणार आहे. खाऱ्या पाण्यावर चालणारा हा कंदील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उजाला योजनेला चालना देईल. २०१५ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. ते म्हणाले, ”ऊर्जा सुरक्षा आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशानं रोशनी दिव्यांसोबत सौर अभ्यास दिव्यांसारख्या योजना राबवल्या जात आहेत.”

हेही वाचा – कैदी नंबर ८९५९..! संजय राऊतांचं जेलमध्ये कसं चाललंय? कोण येतं भेटायला? इथं वाचा!

”भारतीय शास्त्रज्ञांचा आणखी एक चमत्कार! टीम NIOT पहिला “सलाइन वॉटर लँटर्न” घेऊन आली आहे, जो LED दिवे लावण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर करतो. गरजूंसाठी विशेषत: किनारपट्टीवर राहणाऱ्या मासेमारी समुदायासाठी ही सोय आहे”, असं ट्वीटही सिंह यांनी केलं आहे.

शास्त्रज्ञांचं कौतुक

समुद्राचं पाणी नसलेल्या भागातही हे तंत्र वापरले जाऊ शकतं. सामान्य पाण्यात मीठ मिसळूनही हा कंदील वापरता येतो. यामध्ये खर्चही कमी आहे आणि तो सहज चालवता येतो. सिंह यांनी या कंदीलचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणार्‍या लोकांना याचा वापर करता यावा यासाठी त्यांनी या दिव्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास सांगितलं आहे. यादरम्यान डॉ. जितेंद्र सिंह यांनी एमओईएसचे सचिव डॉ. एम. रवीचंद्रन यांच्यासह प्रयोगशाळांना भेट दिली आणि जहाजावर तिरंगा फडकवला. ‘हर घर तिरंगा’, ‘हर जहाज तिरंगा’ मोहिमेची व्याप्ती जहाजांपर्यंत वाढवत सिंह यांनी जहाजावर तिरंगा फडकवला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment