‘या’ एका कवितेच्या आधारावर नेल्सन मंडेला यांनी भोगला तब्बल २७ वर्षांचा तुरुंगवास!

WhatsApp Group

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखले जाणारे नेल्सन मंडेला यांनी वर्णभेदाविरुद्ध लढ्यात आयुष्यातील तब्बल २७ वर्षे तुरुंगात घालवली. तुरुंगात त्यांचा अनेक प्रकारे छळ झाला. मात्र, या २७ वर्षात ते केवळ एका कवितेच्या आधारे जिवंत राहिले. या कवितेमुळं त्यांना लढण्याची हिंमत मिळत होती. त्यामुळं ते या कवितेचं सारखं सारखं वाचन करायचे.  नेल्सन मंडेला हे जगभरातील अन्याय विरोधात लढणाऱ्यां व्यक्तींसाठी नेहमीच हिरो राहिले आहेत. केवळ दक्षिण आफ्रिकेतीलच नव्हे, तर जगभरातील लोकांसाठी ते आदर्श आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा स्वतः मंडेला यांना आपला हिरो मानत होते. २७ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या मंडेला यांना त्या कठीण दिवसांत एका खास कवितेतून वर्णभेदाविरुद्धच्या संघर्षाची ऊर्जा मिळवली होती.

ब्रिटिश कवी विल्यम अर्नेस्ट हेन्ली यांनी ‘इनव्हिक्टस’ ही कविता लिहिली होती. नेल्सन मंडेला यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, ही कविता त्यांच्या जीवनाची प्रेरणा आहे. अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा म्हणून ते तुरुंगात ही कविता पुन्हा पुन्हा वाचायचे. मंडेला यांच्या चरित्रावर बनलेल्या चित्रपटांमध्येही या कवितेचा उल्लेख करण्यात आलाय. मंडेला यांचं संपूर्ण आयुष्य वर्णभेद आणि विषमतेविरुद्ध लढण्यात गेलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी केवळ दक्षिण आफ्रिकेतच नाही तर जगभर भ्रमंती करत न्याय आणि समानतेबद्दल उपदेश दिले.

नेल्सन मंडेला यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत सक्रियता जपली. त्यांना फुटबॉलची खूप आवड होती आणि २०१०च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात तब्येत खराब असतानाही त्यांनी भाग घेतला. दक्षिण आफ्रिकेचं अध्यक्षपद सोडल्यानंतरही ते सामाजिक कार्यात सक्रिय राहिले. जगातील गरीब देशांमध्ये एड्सग्रस्तांसाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी खूप काम केलं.

रोलिहलाहला म्हणजेच नेल्सन मंडेला!

नेल्सन मंडेला यांचं खरे नाव रोलिहलाहला मंडेला असं आहे. ते पहिल्यांदा शाळेत गेले तेव्हा शिक्षकानं त्यांचं नाव बदलून नेल्सन ठेवलं. असं म्हणतात, की त्या काळी शाळांमध्ये बहुतेक इंग्रजी शिक्षक होते आणि त्यांना स्थानिक आदिवासींची नावं उच्चारता येत नव्हती. या कारणास्तव ते बहुतेक मुलांची नावं बदलत असत.

नेल्सन मंडेला हे भारतरत्न मिळालेले पहिले विदेशी होते. १९९० मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. १९९३ मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. मंडेला यांना जगभरातून अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले. त्यांना आधुनिक दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राचे जनक देखील म्हटलं जातं. मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते.

तीन लग्न..

मंडेला यांनी स्त्री-पुरुष समानतेवर खूप भर दिला. मंडेला यांनी प्रथम एव्हलिन नोटोको मासेशी लग्न केलं, मासेशी यांनी १९४४ मध्ये त्यांच्या चळवळीत काम केले होतं. मंडेला आणि एव्हलिन यांना चार मुलं होती, पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. १९५८ मध्ये मंडेला यांनी विनी मेडिक्विसेलाशी लग्न केलं. १९९६ मध्ये, दोघे परस्पर संमतीनं वेगळे झाले आणि १९९८ मध्ये त्यांनी ग्रासा माशेलशी लग्न केलं.

Leave a comment